अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले; भुखंडधारकांना मिळकत जप्तीच्या नाेटीस

महापालिकेच्या (Mahapalika) मिळकतकर विभागाने मार्केटयार्ड (Market Yard) येथील गूळ-भुसार बाजारात अनधिकृतपणे बांधलेल्या साईड मार्जिनमधील बांधकामांबाबत भुखंडधारकांना मिळकत जप्तीच्या नाेटीस पाठविल्या आहेत.

    पुणे : महापालिकेच्या (Mahapalika) मिळकतकर विभागाने मार्केटयार्ड (Market Yard) येथील गूळ-भुसार बाजारात अनधिकृतपणे बांधलेल्या साईड मार्जिनमधील बांधकामांबाबत भुखंडधारकांना मिळकत जप्तीच्या नाेटीस पाठविल्या आहेत. यापुर्वी मिळकत कर भरण्याच्या नोटिसा पाठवूनही संबंधित भुखंडधारकांनी मिळकत कर न भरल्याने मिळकत जप्तीच्या नोटीसा पाठविल्या आहेत. अनधिकृतपणे साईडपट्टीत बांधकाम करणाऱ्यांचे अाता धाबे दणाणले आहेत.

    साईड मार्जिनमधील बांधकामांवर लक्ष केंद्रीत

    महापालिकेने साईड मार्जिन, पार्किंग, टेरेसचा व्यावसायिक वापर करणार्‍यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यांच्याकडून दंडासह मिळकत कर आकारण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. पुणे बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात सुमारे पाचशे भूखंड आहेत. महापालिकेने भूूखंडधारकांना दिलेल्या जागेच्या क्षेत्रात साईड मार्जिनसाठी जागा सोडून बांधकामास परवानगी दिली होती. मात्र, गाळेधारक व्यापार्‍यांकडून या साईड मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. एकूणच मार्केटयार्डात सर्वच विभागात महापालिकेच्या परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली आहेत. आता मिळकतकर विभागाने भुसार बाजारातील साईड मार्जिनमधील बांधकामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, इतर विभागातील बांधकामेही पालिकेच्या रडारवर असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

    साईड मार्जिन मधील बांधकाम पाडण्याची कारवाई

    यापुर्वी साईड मार्जिन मधील बांधकाम पाडण्याची कारवाई करण्याचा प्रयत्न महापािलकेने केला हाेता. परंतु ताे राजकीय हस्तक्षेपामुळे पुर्ण झाला नाही. दरम्यान, काही भुखंडधारकांनी मिळकत कर अाकारणीची चुकीची झाल्याचा दावा करीत न्यायालयात दाद मागितली आहे. साईडपट्टी मध्ये झालेले बांधकाम अधिकृत करून घेण्याचाही प्रयत्न व्यापाऱ्यांकडून झाला हाेता. त्यासाठी वाढीव एफएसअाय मिळावा ही त्यांची मागणी कायम राहीली अाहे. जागा पुरत नसल्याने साईड मार्जिनमध्ये बांधकाम करावे लागल्याचा दावा काही व्यापारी करीत असले तरी प्रत्यक्षात काही जणांनी या जागा भाडेतत्वावर दिल्या अाहेत.