आटपाडीत डॉल्बीचा असह्य दणदणाट; ज्येष्ठ नागरिकांनी अखेर उचलले ‘हे’ मोठं पाऊल

आटपाडी शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये डॉल्बीमुळे (Dolby Sound) होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालावा, अशी मागणी अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेने पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली.

    आटपाडी : आटपाडी शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये डॉल्बीमुळे (Dolby Sound) होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालावा, अशी मागणी अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेने पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीचे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष व्ही. एन. देशमुख, सल्लागार अरविंद चांडवले, कार्याध्यक्ष नंदकुमार राक्षे, सचिव दत्तात्रय मोकाशी, हणमंत राक्षे यांनी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना दिले.

    आटपाडी गावांमधून अनेक वेळेस मंगल कार्यालय प्रसंगी अथवा जत्रांच्या, इतर सार्वजनिक उत्सव तसेच वैयक्तिक समारंभाच्या वेळी डॉल्बीसारख्या कर्णकर्कश आवाज येणाऱ्या साधनांचा सर्रास वापर केला जातो. यामुळे रस्त्याशेजारील घरे, दुकाने, वाटसरू व इतर गाववासियांना या वाद्यांच्या आवाजाने हृदयाचा थरकाप होतो. यामुळे वृद्धांना अथवा तरुणांनाही हृदयविकाराचा धक्का बसू शकतो. यामुळे विनाकारण भयानक आवाजाने जीवितहानी होणार आहे. तेव्हा या वाद्याच्या असह्य आवाजाला लगाम घालावा, अशा वाद्यांना मुळातच परवानगी देऊ नये. जरी परवानगी दिली तर पोलीस बंदोबस्त त्यांच्यासोबत असावा.

    तसेच त्यांचा ठराविक डेसिबलमध्ये आवाज असावा म्हणजे त्यांच्या मिरवणुकीचा गावाला तसेच कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. डॉल्बीवाद्याला आवर घालावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्याकडे केली आहे.