दामाजीची निवडणूक लक्षवेधी होणार; मंगळवेढा उस उत्पादक गटात काका-पुतण्याचा सामना रंगणार

गेली ३५ वर्षे मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर एकहाती वर्चस्व असलेले ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे (Babanrao Awatade) यांनी दामाजी कारखाना निवडणुकीत संस्था मतदारसंघातून आपला अर्ज माघारी घेतला. या निर्णयामुळे सहकाराची सूत्रे आता खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे (Siddheshwar Awatade) यांच्याकडे राहणार आहेत.

  मंगळवेढा : गेली ३५ वर्षे मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर एकहाती वर्चस्व असलेले ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे (Babanrao Awatade) यांनी दामाजी कारखाना निवडणुकीत संस्था मतदारसंघातून आपला अर्ज माघारी घेतला. या निर्णयामुळे सहकाराची सूत्रे आता खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे (Siddheshwar Awatade) यांच्याकडे राहणार आहेत. मात्र, मंगळवेढा ऊस उत्पादक गटात आता आमदार समाधान आवताडे विरुद्ध ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्यात सामना रंगणार असल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  मंगळवेढा तालुक्यातील विकास सेवा सोसायट्या, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीसह विविध सहकारी संस्थांवर एकहाती वर्चस्व आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांना उभे केले होते. या निवडणुकीत आवताडे विरुद्ध आवताडे लढत झाली होती. पोटनिवडणुकीनंतर दामाजी कारखाना निवडणूक लागली आहे. दामाजी कारखाना स्थापनेपासून संस्था मतदारसंघातून कायम बिनविरोध निवडून येणारे जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्याविरुध्द समाधान आवताडे गटाने उमेदवारी ठेवली असून, त्याना या संस्था मतदारसंघात अडकून पडण्यासाठी व बिनविरोध निवडून न येण्यासाठी खेळी खेळली गेली आहे.

  मात्र, सहकारातील दांडगा अनुभव असणारे जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी विरोधी गटाची चाल ओळखून संस्था मतदारसंघात सिद्धेश्वर आवताडे यांची उमेदवारी कायम ठेवत आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. त्यामुळे मंगळवेढा ऊस उत्पादक मतदारसंघातुन आपली उमेदवारी जैसे थे ठेवत आमदार समाधान आवताडे यांना कडवे आव्हान उभे केले आहे. महाविकास आघाडीमधील अनेक मातब्बराचे अर्ज बाद झाल्यानंतर आमदार आवताडे गटाला दामाजीची निवडणूक सोपी जाईल.

  विरोधी गट कमकुवत झाला, असे वाटत असताना चेअरमनपदाचे दावेदार असणारे समाधान आवताडे यांच्याविरुद्ध आता दस्तुरखुद्द जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांनीच दंड थोपटले आहेत. या दोघात थेट लढत होणार असल्याने आमदार गटाची चिंता वाढली आहे. या गटातील लढत ही अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची
  होणार आहे.

  दरम्यान, ‘किसमें कितना है दम’ हे निकालानंतर सष्ट होणार आहे. संस्था मतदारसंघातून जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी उमेदवारी माघारी घेऊन विरोधकाच्या राजकीय खेळीला मोठा धक्का दिला आहे. आमदार आवताडे गट आता अर्ज माघारी घेईपर्यंत अजून कोणते डावपेच आखणार हेही लवकर स्पष्ट होणार आहे. मात्र, या लक्षवेधी लढतीने दामाजीची निवडणूक आता जिल्हाभर गाजणार असल्याचे चित्र आहे.