काका साठे म्हणाले झेडपीत काय चाललंय? ; आता सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशनच्या टेंडरवरून जिल्हा परिषदेमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम उर्फ काका साठे संताप व्यक्त केला. झेडपीत चाललंय काय? आता सर्व अधिकाऱ्यांना बदलण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली.

  सोलापूर: जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशनच्या टेंडरवरून जिल्हा परिषदेमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम उर्फ काका साठे संताप व्यक्त केला. झेडपीत चाललंय काय? आता सर्व अधिकाऱ्यांना बदलण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली.

  केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुमारे 190 कोटीचे टेंडर काढले आहे. टेंडर ओपन करून पात्र ठेकेदारांची यादी प्रसिद्ध करण्याचे वेळ संपली तरी कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी पात्र ठेकेदारांची यादी जाहीर न केल्यामुळे गोंधळ उडाला आहे. टक्केवारीसाठी टेंडर चे काम थांबविण्याचा आरोप अतुल खूपसे- पाटील यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काढलेले टेंडर हाच विषय चर्चेचा झाला आहे.

  बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी जेष्ठ सदस्य बळीराम साठे हे आपल्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याच्या टेंडरविषयी चर्चा रंगली होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन नकाते यांनी सध्या सगळीकडे फक्त ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या टेंडरची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. या टेंडरमध्ये आमदारांनी हस्तक्षेप करण्याची आहे का? त्यांना काय अधिकार आहे? झेडपीच्या टेंडरशी त्यांचा काय संबंध? झेडपीचे माजी सदस्य सोडून आमदारांच्या सांगण्यावरून टेंडर देणारे अधिकारी कोण? असे सवाल उपस्थित केले.

  त्यावर साठे यांनीही संतापून उत्तर दिले. जिल्हा परिषदेमध्ये सध्या काय चाललंय हेच कळत नाही, यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. आता खरेच सर्व अधिकाऱ्यांना बदलण्याची वेळ आली आहे. काका साठे यांचा हा संताप पाहून कार्यकर्तेही दचकले.

  अभियंता कोळी बसले उपाध्यक्षांच्या कार्यालयात
  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या टेंडर मंजुरी वरून मोठा गोंधळ उडाला आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्यावर त्यांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. भ्रमणध्वनीवरही त्यांचा संपर्क झाला नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी कोळी हे दौऱ्यावर असल्याचे सांगितले. पत्रकार कक्षा समोरील उपाध्यक्ष यांच्या कार्यालयातून कोळी कामकाज करित असल्याचे दिसून आले. प्रतिक्रिया देण्यास नकार दिला

  अतुल खुपसे पाटील यांचा इशारा निवळला
  जनहित संघटनेचे अध्यक्ष अतुल ख़ुपसे पाटील हे बुधवारी पाणीपुरवठा विरोधात आंदोलन करणार होते. पण पाणी पुरवठा विभागाने आंदोलन न करण्याचे पत्र खुपसे पाटील यांना दिल्याने आंदोलन तात्पूरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे.