संजयकाकांच्या समोर नाराजीचा ‘अंडर करंट’; पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी, मोदींसाठी मतदान करण्याची मागणी

सांगली लोकसभा निवडणुकीत (Sangli Lok Sabha) भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना उमेदवारी देण्यावरून पक्षात मतभेद होते. मात्र, असे असताना काकांनी थेट अमित शहा यांच्याकडून देशातील पहिल्या यादीत स्वतःची उमेदवारी खेचून आणली.

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली लोकसभा निवडणुकीत (Sangli Lok Sabha) भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना उमेदवारी देण्यावरून पक्षात मतभेद होते. मात्र, असे असताना काकांनी थेट अमित शहा यांच्याकडून देशातील पहिल्या यादीत स्वतःची उमेदवारी खेचून आणली. मात्र, आता त्यांच्यापुढे गेल्या दहा वर्षात या ना त्या कारणाने नाराज झालेल्या नेत्यांचा ‘अंडरकरंट’ थांबवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

  भाजपमध्ये एकदा उमेदवरी दिली की, पक्ष सांगेल ती पूर्व दिशा अशी परंपरा राहिलेली आहे. मात्र, अलीकडे पक्षात मोठ्या प्रमाणात आयात झालेली असल्याने काँग्रेसयुक्त भाजप झालेला आहे. त्यामुळेच भाजपमध्ये सुद्धा आता बंडाची भाषा बोलली जाऊ लागली आहे. संजयकाका हे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. याच आक्रमकतेतून त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतःचा वावर ठेवला आहे. मात्र, हाच वावर आता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.

  विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अशा महत्वाच्या नेत्यांशी असणाऱ्या शीतयुद्धातून जिल्हाभर नाराज गटाचा अंडरकरंट दुसरं करताना भाजपच्या पक्षश्रेष्टीनाही आता त्रास होऊ लागला आहे. ही नाराजी दूर करताना मोदींसाठी आता सगळं विसरा अशी गळ घालून मत मागा असा आदेश देण्यात आलेला आहे.

  दुष्काळी फोरमची साथ सुटली

  दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी दबावगट म्हणून स्थापन झालेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांना सध्या राजकीयदृष्ट्या सुकाळ निर्माण झाला होता. जिल्ह्यातील अनेक निवडणुका, संस्थात्मक कारभारामध्ये फोरमचा हा दबावगट सध्या प्रभावी ठरला.

  संजयकाका यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दुष्काळी फोरममधून प्रवेश झाला. खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश होता. मात्र, आता काकांचे यात पूवीसारखे सख्य राहिले नाही.

  जतमधून बंडाची सुरुवात

  जत तालुक्यात काकांच्या विरोधात उघड भूमिका सर्व प्रथम दुष्काळी फोरममध्ये प्रमुख असणारे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भूमिका घेतली. भाजपचा राजीनामा देऊन त्यांनी काकांना विरोध करी विशाल पाटील यांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे एकीकडे ज्या विक्रम सावंत यांच्यासाठी काकांचे वैर आले. ते विक्रम सावंत राजकीय घडामोडींमुळे आता काकांना मदत करू शकणार नाहीत, तर दुसरीकडे काकांनी स्वतःचा गट उभा केला म्हणून जगताप गट नाराज आहे.

  देशमुखांचे ताट दरवेळी दुसऱ्याला

  ” पक्ष आम्ही वाढवायचा आणि फळ दुसऱ्यांनी खायची” अशी भूमिका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी घेतली होती, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नाराजी काढली असल्याचे समजते, मात्र लोकसभेचा तोंडचा घास गेल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी देशमुख यांच्यावर पक्षाने उमेदवार लादली, विधानपरिषद सहा महिने मिळेल इतकी दिली, संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून जिल्हाभर पक्ष बांधणी केली, मात्र त्यांना डावलण्यात आले, तसचे काकांचे सुद्धा देशमुकांच्या बरोबर शीतयुद्ध सुरूच आहे.

  बाबरांचे कार्यकर्ते नागेवाडी अजून विसरले नाहीत

  नागेवाडी येथील यशवंत कारखान्याच्या मालकीहक्कावरून खासदार संजयकाका आणि दिवंगत शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्यात संघर्ष आहे. ” न्यायालयीन लढाई चालू असताना आमदार बाबर यांच्याकडून कुरघोड्या केल्या जात आहेत. त्यामुळे कारखाना आर्थिक संकटांना सामोरं जात असल्याचा आरोप करीत खासदार पाटील यांनी या कुरघोड्या थांबवल्या नाहीत तर, आपणास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अनिल बाबर यांना दिला होता, तर अनिल बाबर यांनी सुद्धा “काही राजकीय कारणांमुळे कारखान्याचे पुर्नवसन होऊ दिलं नाही.

  यशवंत सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, यासाठी माझी लढाई आहे. यामध्ये काय गैर आहे? माझ्यात ताकद असेपर्यंत ही लढाई मी लढतच राहणार आहे.” असं सांगितलं होते. आता अनिल भाऊंच्या पश्चात लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस सुहास बाबर यांना गोंजारत असले तरी कार्यकर्ते जूना संघर्ष विसरतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.