डंपरच्या धडकेत २० मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू ,अपघात स्थळावर भीषण चित्र

बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या माळावरची देवी मंदिराकडून इंदापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रिंगरोड वरुन रस्ता पार करणाऱ्या मेंढरांच्या कळपाला डंपरने चिरडल्याने सुमारे १७ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुर्दैवी घटनेमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सदर डंपर व रस्ता रोखून धरला.

    बारामती : बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या माळावरची देवी मंदिराकडून इंदापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रिंगरोड वरुन रस्ता पार करणाऱ्या मेंढरांच्या कळपाला डंपरने चिरडल्याने सुमारे १७ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुर्दैवी घटनेमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सदर डंपर व रस्ता रोखून धरला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर अडीच लाख रुपये रक्कम मेंढपाळाला देण्यात आली.हायवा वाहन क्र.(एम.एच.११ सी.एच.७५११ ) ने दिलेल्या जोरदार धडकेत २० मेंढ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला.

    शहरातील वर्दळीच्या असणाऱ्या भिगवण रस्त्याच्या बाजुने इंदापूर रस्त्याकडे जाणाऱ्या मेंढरांच्या कळपाला हायवाने जोरदार धडक दिली.ही धडक एवढी भीषण होती की या २०० मेंढरांच्या कळपातील २० मेंढ्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने येथे रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याने अपघाताच्या ठिकाणचे चित्र फार विदारक दिसत होते.अपघातातील काही गाभण मेंढ्यांच्या पोटातील लहान अर्भक देखील या अपघातात पोट फुटुन बाहेर रस्त्यावर पडले होते.काही मेंढ्यांच्या अंगावरून हायवा गेल्याने पोट फाटून मेंढ्या मरणासुन्न अवस्थेत मरणाची वाट पाहत असल्याचे भीषण चित्र होते.तर अपघाताची बातमी समजताच अपघात स्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.अपघात स्थळी पोलिसांनी धाव घेतली असता अपघातग्रस्त वाहनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जमलेल्या नागरिकांनी केली.तर झालेल्या भीषण अपघाताने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डंपर रोखून धरला. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत डंपर सोडणार नसल्याची भूमिका यावेळी घेण्यात आली. यानंतर मध्यस्थीनुसार प्रति मेंढी पंधरा हजार रुपये प्रमाणे अडीच लाख रुपये रक्कम आरटीजीएस द्वारे मेंढपाळ व्यवसायाकाला ट्रान्सफर करण्यात आली.