केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन उद्यापासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या गुरुवारपासून (दि २२) बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू करणार सुरू करणार असून पहिल्या दिवशी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून या दौऱ्यास सुरुवात होणार आहे.

  अमोल तोरणे, बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या गुरुवारपासून (दि २२) बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू करणार सुरू करणार असून पहिल्या दिवशी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून या दौऱ्यास सुरुवात होणार आहे.

  भाजपच्या मिशन ४५ या अभियानानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार सितारामन या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांशी संवाद साधणार आहेत. देशातील अति महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये अति महत्त्वाचा समजला जाणारा बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपच्या रडारवर आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी भाजपने या मतदारसंघात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या दौऱ्याकडे महाराष्ट्रा सह देशाचे लक्ष लागले आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी सितारामन या खडकवासला विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. यामध्ये भाजपच्या लोकसभा कोअर कमिटी सोबत त्यांची बैठक होणार आहे, लाभार्थ्यांशी संवाद साधून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. दिवशी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी त्यांचा मुक्काम बाबाराजे जाधवराव यांच्या घरी होणार आहे.

  शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार व माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. सकाळी साडेआठ ते साडेनऊ पर्यंत अर्थमंत्री सीतारामन या जेजुरी येथील खंडोबा देवस्थानचे दर्शन घेऊन ९.३० ते ११ दरम्यान शुभम मंगल कार्यालय या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व अन्य लोकप्रतिनिधींबरोबर यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी ११: ३० ते १२ :१५ दरम्यान बारामती तालुक्यातील मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या जन आरोग्य औषध दुकानाची माहिती घेणार आहेत, यानंतर मयुरेश्वर मंदिरात जाऊन मयुरेश्वराचे दर्शन घेणार आहेत. यानंतर बारामती शहरातील भाजप कार्यालयास दुपारी १२:४५ ते सव्वा एकच्या दरम्यान त्या भेट देणार आहेत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या घरी एक तास त्या भोजनासाठी थांबणार आहेत. दुपारी तीन ते चार दरम्यान बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरातील मोनिका लॉन्स या ठिकाणी सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी त्या संवाद साधणार आहेत. यानंतर इंदापूर तालुक्यातील दौऱ्यासाठी अर्थमंत्री सीतारामन या रवाना होणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ६.३० पर्यंत इंदापूर तालुक्यातील जंक्शन या ठिकाणी पालखी महामार्गाची पाहणी करून त्यानंतर शेळगाव या ठिकाणी मतदारांशी संवाद साधणार आहेत. निमगाव केतकी या ठिकाणी गणेश मंदिरात आरती करून रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप अर्थमंत्री सीतारामन यांच्या हस्ते होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सात ते रात्री आठ दरम्यान इंदापुरातील बुद्ध विहारात त्या भेट देणार आहेत. रात्रीचा मुक्काम माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापुरातील निवासस्थानी करणार आहेत.

  दि २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान इंदापुरातील गुरुकृपा मंगल कार्यालयात युवक आणि मतदारांसोबत त्या संवाद साधणार आहेत. यानंतर दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी ११ ते १२
  दरम्यान त्या मतदारांशी संवाद साधणार असून यामध्ये डॉक्टर वकील व व्यापारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.दुपारी १२.४५ ते १.४५ दरम्यान राहु ठिकाणी दौंड चे आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी त्या थांबणार आहेत. दुपारी १.५० ते २.३० दरम्यान राहू या ठिकाणी वृक्षारोपण करून भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांशी त्या संवाद साधणार आहेत. दुपारी अडीच ते सव्वातीन पर्यंत पिंपळगाव या ठिकाणी भाजपचे आयटी, सोशल मीडिया प्रतिनिधी तसेच युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर सायंकाळी साडेचार ‌ते साडेसहा दरम्यान पुणे शहरातील कौन्सिल हॉल या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शासकीय कामाचा आढावा त्या घेणार आहेत. या दौऱ्याच्या संयोजनाची जबाबदारी बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक ठिकाणी असलेल्या कार्यक्रमांची जबाबदारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

  दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट या दौऱ्याच्या माध्यमातून बांधली जाणार आहे. मायक्रो लेव्हल पद्धतीने भाजपने सुरू केलेल्या या नियोजनाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.