
डोंबिवली : भारतीय जनता पक्षाने पुढील लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तयारीसाठी कंबर कसली असून महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभेत भाजप निवडून आणण्यासाठी भाजपने केंद्रीय नेत्यांकडे ही जबाबदारी दिली आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले काबीज करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे आज कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) दौऱ्यावर आहेत.
दरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी डोंबिवलीमध्ये बोलताना त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. इंग्रज भारत सोडून गेले, मात्र इंग्रजांची विचारधारा जपणारे काँग्रेस आज भारतात आहे. काँग्रेस पक्ष जो आज भारत जोडण्याची गोष्ट करतोय त्यांनी प्रत्येकवेळी भारत तोडून भारतावर राज्य केलं असं म्हणत अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनावर सडकून टीका केली.
पुढे बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, राहूल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या नावाखाली देशभरात फीरत आहेत, मात्र तिथे देखील ते एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात भडकवण्याचं काम करत आहेत. राजकीय फायद्यासाठी ते कुठल्याही स्थराला जाऊ शकतात.
हिंदू धर्माला कायमच कमी दाखवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. मात्र आता हे कुठं तरी थांबायला हवं. कर्म आणि धर्म यांचा सन्मान झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. आपण आज जगात अनेक देशांना मागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत.
अयोध्येत भव्य राममंदिर :
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी राम मंदिरावर देखील बोलले. तुम्ही सर्व जण आज जय श्रीरामचा जयघोष करत आहात. मात्र त्यासाठी चारशे वर्षांपेक्षाही अधिक काळ आपल्याला लढा द्यावा लागला. रामलल्लाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी आज त्याचं भव्य मंदिर बनत आहे. या मंदिरासाठी देखील गेले कित्येक वर्ष आपल्याला लढा द्यावा लागला. मात्र जेव्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले, तेव्हा ही वेळ बदलली. आपण न्यायालयीन लढा जिंकला आहे. पुढच्या वर्षभरात अयोध्येत भव्य असे राममंदीर तयार होईल असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.