पंतप्रधान मोदींवर टीका करताच नारायण राणेंनी शरद पवारांनाच सुनावलं; म्हणाले, ‘चुकीची टीका केली तर…’

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर इस्रायल व हमास मुद्द्यावरून चुकीची टीका केली तर सहन करणार नाही, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना दिला.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर इस्रायल व हमास मुद्द्यावरून चुकीची टीका केली तर सहन करणार नाही, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना दिला.

    भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी इस्रायल हमास संघर्षात एकंदरीत दहशतवाद विरोधी भूमिका मांडली. मात्र, त्यावरून पंतप्रधान इस्त्रायलला पाठिंबा देत असल्याचा चुकीचा समज पसरवण्याचा नाहक प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे राणे यांनी नमूद केले.

    राणे म्हणाले की, पवार हे एकीकडे पॅलेस्टाईनची बाजू घेत आहेत व इस्रायलची बाजू घेतली म्हणून पंतप्रधानांवर बिनबुडाची टीका करत आहेत. पवार यांनी केंद्रात देशात आणि राज्यात अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत पवार यांनी मार्च १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटादरम्यान मशिदीमध्येही बॉम्बस्फोट झाला, असे हेतुपूर्वक असत्य कथन केले होते.

    एका विशिष्ट समाजाच्या तुष्टीकरणासाठी मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने राजकीय हेतू ठेवून असे खोटे बोलणे हे देशहिताच्या विरोधात होते. शरद पवार हे देश प्रथम अशी भूमिका कधी घेणार, असा सवाल ही राणे यांनी केला.