सोलापूर ते पुणे, सोलापूर ते विजापूर रस्ता सहा पदरी करणार : नितीन गडकरी 

सोलापूर ते पुणे ६ पदरी करण्याची मागणी आहे. दिल्लीला गेल्यानंतर तात्काळ डीपीआर तयार करून घेईन. सोलापूर- विजापूर रस्ता लवकरच ६ पदरी करण्यासाठी लवकर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर ते पुणे सहा पदरी करण्याची मागणी आहे. दिल्लीला गेल्यानंतर तात्काळ डीपीआर तयार करून घेईन. सोलापूर- विजापूर रस्ता लवकरच ६ पदरी करण्यासाठी लवकर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.

    सोलापूर येथील शासकीय मैदानातील कार्यक्रमात ते बोलत होते. मागे सोलापूरला आलो असताना अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी अनेक घोषणा पूर्ण झाल्या. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त काम सोलापुरात झाले असावीत असा माझा अंदाज आहे. जुना पूना नाका ते सात रस्ता पूल निविदा प्रक्रिया सुरु आहे. चेन्नई-सुरत महामार्गांवर जाताना लॉजिस्टिस्क, इंडस्ट्री पार्क उभारा, विकास होईल. हा देशातला महत्वाचा हायवे असेल.

    मनालीमध्ये तयार करण्यात आलेल्या अटल टनेलमुळे ३ तासाचा वेळ केवळ ९ मिनिटात पूर्ण होतोय. आम्ही भूसंपादनासाठी १७ हजार कोटी रुपये दिले. भुसंपादन रक्कम वाढावी म्हणून महाराष्ट्रमध्ये काही जणांनी झाडं लावली आहेत म्हणून ऐकलं. आम्ही काय असले धंदे करणार नाही, असे ही ते म्हणाले.

    भाषणात ज्या-ज्या आमदारांनी, खासदारांनी मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मंजूर करण्याची घोषणा मी या ठिकाणी करतो, असे आश्वासन गडकरी यांनी दिले .

    इलेक्ट्रिक केबलवर बस, ट्रक चालतील असे प्रयत्न आहेत. पायलट प्रोजेक्ट सुरु आहे. यासाठी सोलापूरमधून प्रस्ताव पाठवा, लोकांना एसी गाडीमधून फिरवा. मी केवळ आश्वासन देत नाही आणि दिलं तर ते पाळतोच. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे घेऊन जातोय. राज्य सरकारने हायवेच्या बाजूला जागा दिली तर लॉजिस्टिक पार्क बांधू, असं ही ते म्हणाले.