रामदास आठवलेंनी लोकसभेच्या ‘इतक्या’ जागांची केली मागणी; म्हणाले, ‘गरज पडली तर मोदींना भेटेन’

महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महाराष्ट्रात 26 जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर पुन्हा सारवासारव केली होती. यावर आता केंद्रात मंत्री असलेल्या रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेच्या दोन जागांवर दावा जाहीर करून टाकला आहे.

    संभाजीनगर : लोकसभेची निवडणूक लागायला अवघे तीन महिने राहिले आहे. अशातच महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महाराष्ट्रात 26 जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर पुन्हा सारवासारव केली होती. यावर आता केंद्रात मंत्री असलेल्या रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेच्या दोन जागांवर दावा जाहीर करून टाकला आहे. गरज पडली तर यासाठी मोदींनाही भेटणार असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले आहे.

    दोन जागांपैकी, शिर्डीमधून स्वतः रामदास आठवेलेना स्वतः आठवलेंनीच आज तशी इच्छा व्यक्त केली आहे. आता शिर्डीची जागा कोणाला सुटणार यावरून महायुतीतील रुसवेफुगवे रंगण्याची चिन्हे आहेत. महायुतीमध्ये शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादीही आहे. यामुळे तीन पक्षांमध्ये जागा वाटल्या जाणार आहेत. भाजप आपल्या इतर मित्रपक्षांना आपल्या वाट्याला आलेल्या जागा देण्याची शक्यता आहे.

    शिर्डीतूनच लढविणार

    आठवले यांनी म्हटले की, 2009 मध्ये मी लोकसभा निवडणूक लढविली होती. शिर्डी मतदारसंघातून मी तेव्हा हरलो होतो. परंतु, पुढची लोकसभा निवडणूक शिर्डीतूनच लढण्याची इच्छा आहे. याबाबत मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही चर्चा केली आहे. अमित शाहांशीदेखील बोलणार आहे. गरज पडली तर मोदींनाही भेटेन, असे आठवले यांनी म्हटले आहे.

    आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद योग्य नाही

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा वाद होणे योग्य नाही. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला महाराष्ट्रातही स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण देता येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. मराठा समाजातील गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे पण ते करताना इतर मागासवर्गीयांचे नुकसान होऊ नये, असेही मत आठवले यांनी मांडले आहे.