नाराज उन्मेश पाटील थेट मातोश्रीवर; म्हणाले, “नाही म्हणताना वेदना होत आहेत…”

जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांचे देखील तिकीट कापल्यामुळे नाराजीचा सूर आहे. उन्मेश पाटील यांनी मातोश्री जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

    मुंबई – देशामध्ये लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्याचे राजकारण जोरदार रंगत आहेत., उमेदवारी, पक्षप्रवेश आणि नाराज इच्छुक यांच्या भेटीगाठी बाढल्या आहेत. दरम्यान, भाजपचे विद्यमान खासदार नाराज असल्याची चर्चा आहे. जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांचे देखील तिकीट कापल्यामुळे नाराजीचा सूर आहे. उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी मातोश्री जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली. यामुळे उन्मेश पाटील लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मातोश्रीवरील भेटीनंतर उन्मेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

    जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगणार आहे. येथील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज उन्मेश पाटील यांनी आज (दि.02) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असून त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. संज राऊत यांच्या भेटीनंतर उन्मेश पाटील म्हणाले, ही मैत्रिपूर्ण भेट होती. मी लवकरच यावर सविस्तरपणे बोलेन. आता काही बोलणे उचित नाही. संजय राऊत आणि आम्ही संसदेत एकत्र काम केलं आहे. राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपावी लागते. आमची नेहमी चर्चा होत असते. प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका, असे स्पष्टीकरण उन्मेश पाटील यांनी दिले.

    नाही म्हणताना वेदना होत आहेत

    पुढे उन्मेश पाटील म्हणाले, “आपल्या सर्वांचा मी मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, आपल्या मनातील सगळे प्रश्न यावर मी सविस्तर आपल्याशी बोलेन. आता मला असं वाटतं की, मी आज बोलणं उचित नाही. तुम्हाला नाही म्हणताना वेदना होत आहेत. त्यामुळे मी आपल्यासोबत वेगळा संवाद साधेन. उद्या सकाळी यावर सविस्तर बोलेन, असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. मी आणि राऊत साहेबांनी संसदेच्या सभागृहात सोबत काम केलं आहे. राऊत साहेबांसोबत कायम चर्चा होत असते. त्या निमित्ताने मी आज संवाद साधण्यासाठी आलो आहे, प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारणाच्या दृष्टीने बघू नका. राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपली पाहिजे, ती जपली जात नाही. राजकारणा पलिकडील मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया उन्मेश पाटील यांनी दिली आहे.