संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मागील काही दिवसांपासून वातावरण निरभ्र असतानाच पुन्हा हवामान विभागाने विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तविली आहे. विशेषतः जिल्ह्यात हवामान विभागाने दोन दिवस अलर्ट जाहीर करत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

    गडचिरोली : मागील काही दिवसांपासून वातावरण निरभ्र असतानाच पुन्हा हवामान विभागाने विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तविली आहे. विशेषतः जिल्ह्यात हवामान विभागाने दोन दिवस अलर्ट जाहीर करत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचे सावट कायम असल्याचे चित्र आहे.

    जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. मागील आठवड्यात नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या धान कळपा पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर या ढगाळी वातावरणाचा तूर पिकालाही फटका बसला आहे. दरम्यान मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात निरभ्र आकाश उजाळले होते. अशातच हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची पुन्हा शक्यता वर्तविली. या शक्यतेनुसार सोमवारी पहाटेपासूनच ढग दाटून आले. सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरासह परिसरात पाऊसारी काही सरी आल्या.

    दरम्यान, नागपूर हवामान विभागाने मंगळवार व बुधवार असे दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करत जिल्ह्यातील एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी धान कापणी, बांधणी व मळणीच्या लगबगीत असताना अवकाळी पावसाचा हा इशारा शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरविणारा ठरत आहे.