जुन्नर तालुक्यातील डिंगोरे परिसरात अवकाळी पाऊस; मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन पावसाचे वातावरण तयार झाले होते.

    ओतूर : जुन्नर तालुक्यातील डिंगोरे परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन पावसाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

    वादळी वारे आणि गारपिटीने डिंगोरे परिसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकासह, टोमॅटो, मिरची, झेंडू, काकडी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी आदी पिकांसह आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे.

    दरवर्षी काही ना काही संकटांना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. पिकांसाठी खते, बि- बियाणे, मजूरी, औषधे आदींमध्ये भाववाढ झाली आहे. त्यामुळे केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याचे येथील प्रगतशील शेतकरी अंकुश आमले यांनी सांगितले. दुपारीच्या सुमारास ओतूर, रोहोकडी, ठिकेकरवाडी, आंबेगव्हान, पाचघर, चिल्हेवाडी कोपरे, मांडवे, मुथाळने, हिवरे बुद्रुक, ओझर या भागात देखील वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली.