साताऱ्यात पुन्हा अवकाळी ढग; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण, हुडहुडी मात्र नाहीच !

डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आलातरी किमान तापमान कायम १५ अंशावर राहत आहे. यामुळे जिल्हावासियांसाठी हुडहुडीची थंडी नाहीच. त्याचबरोबर महिन्यात दोनवेळा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला असून, कायम ढगाळ वातावरण राहत आहे.

    सातारा : डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आलातरी किमान तापमान कायम १५ अंशावर राहत आहे. यामुळे जिल्हावासियांसाठी हुडहुडीची थंडी नाहीच. त्याचबरोबर महिन्यात दोनवेळा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला असून, कायम ढगाळ वातावरण राहत आहे. परिणामी, शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

    दरवर्षी नोव्हेंबर महिना उजाडताच थंडीला सुरुवात होते. हळूहळू थंडीचे प्रमाण वाढत जाते. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पारा १० ते १२ अंशापर्यंत खाली येतो. तसेच, डिसेंबर महिन्यातही थंडीची लाट राहते. सलग आठ-आठ दिवस हुडहुडी भरविणारी थंडी असते. पण, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. तसेच थंडीच्याबाबतही झाले आहे. डिसेंबर महिना सुरू होऊन सहा दिवस झालेतरी थंडीची तीव्रता कमी जाणवत आहे. यामुळे जिल्हावासीय थंडीपासून दूरच आहेत.

    पुन्हा पावसाची शक्यता

    जिल्ह्यातील मागील एक महिन्याच्या काळात अवकाळीचा पाऊस दोनवेळा पडला आहे. यामुळे पिके आणि फळबागांचेही नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे. परिणामी, जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.