बीडला अवकाळी पावसानं झोडपलं; वीज पडल्याने मुलाचा मृत्यू, तर बैलजोडीही ठार

बीड जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज पडल्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार झाली आहे.

    बीड : हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, बीड जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज पडल्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा तर आष्टी तालुक्यात बैलजोडी ठार झाली आहे.

    राज्यात येत्या काही दिवसात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस सुरु असताना विजांचा कडकडाट देखील झाला. गेवराई तालुक्यात वीज पडून एका मुलाचा तर आष्टी तालुक्यातील गौखेल येथे बैलजोडीचा मृत्यू झाला आहे.

    आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज

    अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे आंब्यालाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.