अवकाळीचा ९५५ हेक्टरमधील भात पिकास फटका; ‘इतक्या’ टक्क्यांनी उत्पादनात घट

अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे यंदा सरासरी २५ टक्क्यांनी भात उत्पादनात घट झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

    आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, निगडाळे, तेरुंगण, राजपूर, गाडेवाडी, फलोदे, तळेघर, जांभोरी, पोखरी, साकेरी, पाटण, कुशिरे खुर्द, आदी गावांमध्ये ९ व १० नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे यंदा सरासरी २५ टक्क्यांनी भात उत्पादनात घट झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

    नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व मंडल कृषी अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार अवकाळी पावसाने सुमारे ९५५ हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आहे. हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. यंदा या भागात ५२०० हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली होती.

    लवकर भरपाई देण्याची मागणी

    भात कापणीची कामे सुरू असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताच्या आळाशी खाली भाताची अक्षरशः पेर झाली तर काही भातांना मोड आले. हातातोंडाशी आलेले भात पीक हिरावल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाने भाताचा पेंढा भिजून काळा पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.