
विदर्भ, मराठवाड्या, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रसह कोकण या ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. गारपिटीमुळे शेतमालासह मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटाने हजारो हेक्टर शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले.
नागपूर– राज्यात हवामान बदलामुळं आणि वातावरणातील बदलामुळं राज्यात अवकाळी पावसाने (Rain) गारपीटसह हजेरी लावली आहे. पश्चिमी विक्षोभामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रभावाने अवकाळीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 15 मार्च ते 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे (farmers) मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्या, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रसह कोकण या ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. गारपिटीमुळे शेतमालासह मोठ्या प्रमाणात वित्तहानी (Finance) झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटाने हजारो हेक्टर शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले.
अवकाळीचे अनेक बळी
दरम्यान, मराठवाडा आणि खान्देशात अवकाळीशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला. तर वीज कोसळून विदर्भात दोघांचा व नाशिक जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मराठवाड्यात पाच जणांचा बळी गेला होता. रविवारीही काही भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. सोमवारनंतर मात्र हे अवकाळी संकट सरेल, अशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळं शेतीच्या पिकांसह पावसाने माणसाचे देखील बळी घेतले, असं लोकांची भावना आहे.
पंचनामे न करत सरसकट मदत द्या
अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची शिंदे सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट भरपाई दिली होती. आताही त्याच धर्तीवर मदत दिली जाईल. त्याची घोषणा राज्य सरकार गुढीपाडव्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात करेल, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र पंचनामे न करता नुकसानीची सरसकट सरकारने मदत करावी असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
कुठे किती नुकसान
विदर्भात अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, भंडारासह चंद्रपूर जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडाले. जनावरांच्या गोठ्यांचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, येवल्याला शनिवारी गारपीट, अवकाळी पावसाने झोडपले. निफाडमधील द्राक्षबागांत गारांचा अक्षरश: थर साचला होता. खान्देशातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू, हरभरा, केळी, पपई, मका, हरभरा, ज्वारी, टरबूज, कांद्याचे नुकसान झाले. सातपुडा पर्वतरांगेतील तोरणमाळ परिसरातही गारांचा पाऊस पडला. जळगाव, नगर जिल्ह्यातही अवकाळी तडाखा बसला. तर मराठवाडात १६ हजारांवर हेक्टर पिकांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, व हिंगोली जिल्ह्यात शनिवारीही गारपीट झाली. मराठवाड्यात १५ ते १७ मार्चपर्यंत तब्बल १६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. या विभागात सहा जणांचे बळी गेले आहेत. ज्वारी, गहू, मका या रब्बी पिकांसोबतच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.