
अमृता फडणवीसांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी अनिल आणि त्याची मुलगी अनिक्षा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. १६ मार्च रोजी डिझायनर अनिष्का जयसिंघानीला अटक करण्यात आली.
मयुर फडके, मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री (Maharashtra DCM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता (Wife Amruta Fadnavis) यांना एका फौजदारी खटल्यात हस्तक्षेप करून त्यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डिझायनर अनिष्का जयसिंघानीला (Designer Aniksha Jaisinghani) सोमवारी मुंबईतील सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) जामीन (Bail) मंजूर केला. ५० हजारांच्या मुचलक्यावर सुटका करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.
अमृता फडणवीसांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी अनिल आणि त्याची मुलगी अनिक्षा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. १६ मार्च रोजी अडिझायनर अनिष्का जयसिंघानीला अटक करण्यात आली. त्यांच्यावर कट रचणे, खंडणी व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींशी संबंधित आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर अनिष्काला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर तिने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.
आपल्याविरोधातील एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) खोट्या आरोपात गुंतवण्यासाठी आणि काल्पनिक तथ्यांवर आधारित आहे. त्यामुळे आपली अटक आणि पोलीस कोठडीत रवानगी हे राज्यघटना आणि फौजदारी प्रक्रिया संहिता प्रक्रियेच्या नियमांचे संपूर्णतः उल्लंघन आहे, असा दावा जामीन अर्जात अनिष्काने केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले यांच्यासमोर सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. तेव्हा, सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेऊन न्यायालयाने अनिष्का जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या मुचलक्यासह आपला पासपोर्ट मलबार हिल पोलीस ठाण्यात जमा कऱणे आणि तपासात पोलिसांना सहकार्य कऱणे या अटींवर अनिष्काची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
अनिष्काने अमृता यांना पाठवेल्या एका मेसेजमध्ये तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (युबीटी) नेते उद्धव ठाकरे यांच्या नियमित संपर्कात असल्याचा दावा केला होता अशी माहिती सरकारच्या वतीने सोमवारी न्यायालयात देण्यात आली. अनिष्काने अमृता यांना धमकावण्यासाठी पाठवेल्या एका मेसेजमध्ये माझे वडील नियमितपणे शरद पवार आणि उद्धव यांच्या संपर्कात असतात. ते त्यांना तुमचे व्हिडिओ त्यांना देतील, असे नमूद केले होते. त्यामुळे या कटात विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असल्यामुळे चौकशी होणे आवश्यक असल्याचे सरकारकडून युक्तिवाद करताना सांगण्यात आले.
अनिल जयसिंघानीला न्यायालयीन कोठडी
अमृता यांना ब्लॅकमेल करून लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित बुकी अनिल जयसिंघानीला सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गेल्या आठवड्यात अनिलसह त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. सोमवारी कोठडी संपल्यानंतर या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी दोघांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. मात्र त्यांची मागणी फेटाळून लावून न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत सुनावली.