अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसची तातडीची बैठक; पण बैठकीला ‘त्या’ आमदारांची दांडी, आज पुन्हा मंथन

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्ष सोडल्यानंतर कॉंग्रेस पक्षाची बुधवारला तातडीची बैठक झाली. यात विदर्भातील चार आमदारांनी दांडी मारल्याची माहिती आहे. तर, काहींनी गुरूवारच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे सांगितले.

    नागपूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्ष सोडल्यानंतर कॉंग्रेस पक्षाची बुधवारला तातडीची बैठक झाली. यात विदर्भातील चार आमदारांनी दांडी मारल्याची माहिती आहे. तर, काहींनी गुरूवारच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे सांगितले. चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर विदर्भाला फटका बसेल असे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर चार आमदारांनी बैठकीला दाखवलेली पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    गोंदियातील सहसराम कोरेट्टी, राजुऱ्याचे सुभाष धोटे, उमरेडचे राजू पारवे आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी मुंबईतील बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी बैठकीत हजेरी लावली. पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. अभिजीत वंजारी यांनी गुरूवारच्या बैठकीला जात असल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या निर्णयानंतर कॉंग्रेसला विदर्भातही धक्का बसेल, अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तातडीच्या बैठकीतील गैरहजेरीची नोंद पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती आहे.

    गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे आमदार सहसराम कोरेट्टी हे काही दिवसात आपला निर्णय घेतील, अशी माहिती पुढे आली आहे. चंद्रपूरच्या राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांचाही निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमरेडचे राजू पारवे यांची गेल्या वर्षभरापासूनच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असल्याचे काँग्रेस कार्यकतेंच सांगत आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी आहे.

    या सर्व घडामोडीत मात्र शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची गैरहजेरी आश्चर्यकारक आहे. त्यांना काँग्रेस समर्थनात रिंगणात उतरवले. तेव्हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या पाठीशी पक्षाचे बळ लावले होते. त्यामुळे ते चव्हाण यांच्याबरोबर जाणार असतील तर तो धक्काच मानला जाईल.