उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी सोडविणार; लोणी काळभोर पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी लक्ष घातले असून, त्यांच्या अखत्यारीतील पोलीस कर्मचाऱ्यांना अलर्ट करत चुकीचे व बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या, ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतुकीच्या नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा आणि अतिशय कठीण झाला आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी लक्ष घातले असून, त्यांच्या अखत्यारीतील पोलीस कर्मचाऱ्यांना अलर्ट करत चुकीचे व बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या, ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतुकीच्या नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पोलीस चौकीत वाहतूक कोंडी संदर्भात बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. १६) करण्यात आले होते, यावेळी पोलीस निरीक्षक चव्हाण बोलत होते.

  यावेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंडीत, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब ल. कांचन, माजी सरपंच संतोष ह. कांचन, राजेंद्र ब. कांचन, दत्तात्रय शां. कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित (बाबा) कांचन, आदित्य कांचन, पत्रकार आदी उपस्थित होते.

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यासारख्या अनेक मान्यवरांना या वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी व वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अलर्ट मोडवर आले आहेत. पुढे बोलताना शशिकांत चव्हाण म्हणाले, “पुणे – सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे. याचा फटका वाहन चालकांना बसत आहे, परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शुक्रवारपासून सेवा रस्त्यावर तसेच महामार्गावर गाड्या लावून बिनदिक्कत फिरणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर ऑनलाईन दंड आकारण्यात येणार आहे”.

  पालखी मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत व पोलीस यांच्या समन्वयातून काम केले जावे, अशी चर्चा सुरू असताना उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मात्र विसंवाद दिसून आला. लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही मोठ्या गावात स्वयंचलित सिग्नल बसवल्या आहेत मात्र त्या कार्यान्वित केल्या नसल्यामुळे त्याचा उपयोग होताना दिसत नाही. यासाठी अधिक चौकशी केली असता समजले की सिग्नल चालू केल्याने मोठ्या रांगा लागतील म्हणून त्या चालू केल्या जात नाहीत, परंतु सिग्नल चालू नसताना आताही वाहतूक कोंडी होऊन जवळपास दोन दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागतात हे कसे चालते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

  रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणाचा विळखा

  महामार्गावर चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे, सिग्नल तोडणे, वाहतूक पोलिसांच्या सूचना न पाळणे या वाहनांवर व वाहन चालकांवर शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.