ठाकरे गटातील नेते-पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना; पण काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या…

राज्यात भाजप-शिवसेनेचे (BJP-Shiv Sena Government) सरकार सत्तेवर होते. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांच्या (Opposition Party Leaders) फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचं नाव समोर आले होते.

    मुंबई : राज्यात भाजप-शिवसेनेचे (BJP-Shiv Sena Government) सरकार सत्तेवर होते. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांच्या (Opposition Party Leaders) फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचं नाव समोर आले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाने सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यानुसार, ठाकरे गटातील नेते-पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

    दानवे म्हणाले, सध्या ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे. त्यानुसार, आपापली सुरक्षा लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे, अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पण याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही. मात्र, जबाबदार लोकांनी जबाबदारीने राहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

    शिवसेनेला जे काही करायचं ते समोरासमोर करते

    मागील काळात रश्मी शुक्ला यांना सरकारने फोन टॅपिंग करण्याचे सांगितले होते. त्यामुळे सध्या देखील सरकारचं मुद्दामहून, जाणीवपूर्वक नेत्यांच्या हालचालींवर लक्ष असते. त्यामुळे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. पण त्यांचं लक्ष असेल म्हणून काही घाबरून जाण्याची गरज नाही. शिवसेनेला जे काही करायचं ते समोरासमोर करते. पण तरीही मी माझ्या येथील सर्व पदाधिकारी यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    सर्वांनाच तशा सूचना नाहीत

    ठाकरे गटातील नेते-पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारे सूचना देण्यात आल्या असल्या तरी या सूचना सर्वांसाठीच आहे, असे नाही. ज्यांना जमतं त्यांनी आयफोनचा वापर करावा. अद्याप काही जणांकडे फोन नाहीत. त्यामुळे या सूचना सर्वांनाच लागू असतील असे नाही, असेही त्यांनी सांगितले.