सामाजिक जाणीव असलेला नागरिक घडविण्यासाठी उपयुक्त उपक्रम : डॉ. अनिल काकोडकर

सामाजिक जाणीव असलेला नागरिक घडविण्यासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप हा उपयुक्त उपक्रम आहे, असे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सामाजिक जाणीव असलेला नागरिक घडविण्यासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप हा उपयुक्त उपक्रम आहे, असे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.

  बारामती येथे आयोजित शरद पवार इन्स्पायर फे‍लोशिप उन्हाळी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगपती गौतम अदानी, खासदार सुप्रिया सुळे, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.विवेक सावंत, डॉ. सी. डी. माई, प्रीती अदानी, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

  डॉ. काकोडकर म्हणाले, नवे संशोधन, नव्या कल्पनांना मूर्त रुपात आणणे आणि व्यवसाय सुरू करण्यासोबत सामाजिक जाणीव असलेला आदर्श नागरिक घडविण्यासाठी शरद पवार इन्स्पायर फे‍लोशिप उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. या उपक्रमातून तरुणांना आत्मविश्वास मिळेल. या माध्यमातून नेतृत्वाची शृंखला तयार व्हावी आणि वैयक्तिक जीवनात प्रगती करताना तरुणांनी समाजात मोठ्या क्रांतीसाठी आपले कर्तव्य पार पाडावे.

  मोठे ध्येय गाठताना क्षमतेसोबत निवडलेल्या क्षेत्राशी संबंधित वातावरणात असणाऱ्या समस्यांचा अभ्यासही महत्वाचा आहे. या समस्येतून मार्ग काढणे हेच उद्योजकांचे खरे कौशल्य असून परस्पर संवादातून हे शक्य आहे. त्यासाठी आत्मसात केलेल्या नव्या संकल्पनांचे परस्पर आदानप्रदान व्हावे. शिबिरातील युवकांनी एकमेकांशी जोडलेले राहून येणाऱ्या युवकांनाही मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.

  शरद पवार इन्स्पायर फेलोशीप शिबिरात सहभागी युवकांनी आपल्या नव्या संकल्पनांचा समाजाला उपयोग करून देण्याचे ध्येय समोर ठेवताना सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

  पवार म्हणाले, शिबिरात सहभागी युवकांची राज्यभरातून निवड झाल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि कृषी, कला, साहित्य, संरक्षण, क्रीडा आदी विविध क्षेत्रात योगदान असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार अशा दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची नावे शिष्यवृत्तीशी जोडली गेल्याने त्याला साजेसे कार्य करण्याची जबाबदारी शिबिरात सहभागी युवकांवर आहे. शिबिराच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असणारा वेगळा विचार करणारे तरुण पुढे यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.