‘मी संस्थापक सदस्य असून अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो’; ‘या’ नेत्याने दिला इशारा

त्यानंतर मीच अजित पवार यांना पक्षातून बाहेर काढू शकतो असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.

    सोलापूर : राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी रंगात आली आहे. अजित पवार यांच्यासाठी बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची आणि भविष्य ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटामध्ये असणाऱ्या उत्तम जानकर यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मीच अजित पवार यांना पक्षातून बाहेर काढू शकतो असा दावा देखील उत्तम जानकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

    माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ता बैठकीमध्ये उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. उत्तम जानकर म्हणाले, “मला अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही. मी देखील दररोज विचारत आहे की, मला पक्षामधून काढले का? कारण पक्षाचा संस्थापक सदस्य मी पण आहे. मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो. कारण मी पक्षाचा सदस्य आहे. शरद पवारांना अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवारांना काढायला अडचण काय? काढू शकतो”, असे वक्तव्य उत्तम जानकर यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.

    अजित पवार गटामध्ये सामील झालेल्या उत्तम जानकर यांनी चार्टर विमानाने नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर जानकर भाजपसोबत जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये उत्तम जानकर यांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली. तेव्हापासून उत्तमस जानकर हे अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत.