चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील.

    मुंबई : धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान तर; २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

    मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील. ५ डिसेंबर २०२१ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १० डिसेंबर २०२१ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी होईल.

    पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे अशी: धुळे- ५ब, अहमदनगर- ९क, नांदेड वाघाळा- १३अ आणि सांगली मिरज कुपवाड- १६अ.