यंदा गळीत हंगामात ऊस वाहतुकीतील बैलांचे लसीकरण बंधनकारक ; लंम्पी स्कीनचा जनावरांना प्रादुर्भाव

यंदाचा उसाचा गळीत हंगाम जवळ आला आहे. अशातच लंम्पी स्कीनचा जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण बंधनकारक केले जाणार आहे.

    रांजणी : यंदाचा उसाचा गळीत हंगाम जवळ आला आहे. अशातच लंम्पी स्कीनचा जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण बंधनकारक केले जाणार आहे. त्यामुळे ऊस वहातुकीसाठी बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

    चालू वर्षी उसाचा गळीत हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होत आहे. त्या अनुषंगाने राज्यात पशुधनाला लंम्पी स्किनची लागण झालेली आहे. हा रोग वाढण्याची शक्यता कमी असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले तरी खबरदारीचे सर्व उपाय योजले जात आहेत.

    -राज्यात हार्वेस्टरने ऊस तोडणी वाढली
    दरम्यान साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगामात लसीकरण न केलेल्या जनावरांचा वापर ऊसतोड आणि वाहतुकीसाठी करू नये असे निर्देश साखर आयुक्तालयातून देण्यात आले आहेत. राज्यात हार्वेस्टरने ऊस तोडणी वाढली आहे. तसेच वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर देखील वाढला आहे. परंतु ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्यांचा देखील वापर मोठ्या प्रमाणात होतो.

    -ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर देखील वाढला
    लंम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसून आल्यामुळे सर्वच साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक व्यवस्थापक आणि शेतकी अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे . आपापल्या साखर कारखान्यांकडे बाहेरील जिल्ह्यातून बैलगाडी करिता बैल घेऊन येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या नावांची गाव निहाय यादी अद्ययावत करा. ही यादी तातडीने संबंधित मजूर ज्या जिल्ह्यातून येणार आहेत, त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्तांना पाठवा अशा सूचना साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिल्याचे समजते.

    दरम्यान ऊस वाहतुकीसाठी येणाऱ्या मजुरांच्या सर्व बैलांचे गावातून निघण्यापूर्वीच किंवा निघत असताना लंम्पी स्कीन रोग प्रतिबंधक लस दिली पाहिजे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाला नियोजन करणे सोयीचे जाण्यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळे साखर आयुक्तालयाने वेळीच हस्तक्षेप करून साखर कारखान्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

    राज्याच्या ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबर मध्ये सुरू होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो बैल विविध कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील लंम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जनावरांचे आरोग्य विषयक नियोजन महत्वाचे राहील. त्यामुळे साखर कारखान्यांकडे बैल घेऊन येणाऱ्या मजुरांची यादी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे पाठवण्याच्या सूचना दिल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.