दुष्काळी माण मध्ये लम्पीबाबत युध्दपातळीवर लसीकरणास सुरुवात

पशुधनाला होणाऱ्या लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांमध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरती आज दुष्काळी तालुका समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात लम्पीबाबत युध्दपातळीवर लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

    म्हसवड : पशुधनाला होणाऱ्या लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांमध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरती आज दुष्काळी तालुका समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात लम्पीबाबत युध्दपातळीवर लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. दहिवडी शहरात लसीकरण करण्यात आले यावेळी माण खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी, बांधकाम सभापती महेश जाधव, डॉ.आरिफ इनामदार, डॉ. स्मिता मलगुंडे, डॉ. प्राजक्ता भुजबळ, डॉ चंद्रकांत खाडे उपस्थित होते.

    यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी म्हणाले की लम्पी हा विषानुजन्य त्वचारोग असल्यामुळे त्याचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी नागरिकांत लम्पी या आजाराबाबत माहिती देऊन तात्काळ लसीकरण पूर्ण करून घ्यावे शेतकरी व स्थानिक डॉक्टर यांची मदत घ्यावी.

    डॉ. इनामदार यांनी बोलताना सांगितले की, लसीकरण केल्याने दुग्ध व्यवसायावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रभावी जनजागृत करत आहोत. तालुक्यात आम्ही लसीकरणाचा वेग वाढवला आहे. खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना देखील आम्ही मदतीसाठी घेतलं आहे. २५ शासकीय कर्मचारी यांच्या सह खाजगी डॉक्टर टीम कार्यरत करण्यात आली आहे.

    बांधकाम सभापती महेश जाधव म्हणाले सर्वसामान्य शेतकरी वर्गाला या मोहिमेत सामील करून शेतकऱ्यांचे गोधन वाचविण्यासाठी आणि त्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून गावागावात जनजागृती होणे देखील गरजेचे आहे. लसीकरण केल्याने दुग्ध व्यवसायावर याचा कोणताही परिणाम होत नाही याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.