बांधकाम साहित्य चोरट्यांनी केला साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

रविंद्र संचेती रा.मारवाडी गल्ली हे कंत्राटदार असून त्यांनी मार्च २०२३ मध्ये तालुक्यातील धोंदलगाव - बाभुळगाव रस्त्यावरील पुलाचे कंत्राट घेतले होते.

    वैजापूर : पुलाच्या कामासाठी आणलेले साडेचार लाख रुपये किंमतीचे स्टील चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना तालुक्यातील धोंदलगाव शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र संचेती रा.मारवाडी गल्ली हे कंत्राटदार असून त्यांनी मार्च २०२३ मध्ये तालुक्यातील धोंदलगाव – बाभुळगाव रस्त्यावरील पुलाचे कंत्राट घेतले होते. तेव्हापासून या पुलाचे काम सुरू असून आतापर्यंत अर्धे काम पार पडले आहे. त्यांनी कामासाठी लागणारे सिमेंट व स्टील लगतच असलेल्या मनसुख झांबड यांच्या शेतवस्तीलगत उघड्यावर आणून टाकले होते.

    दरम्यान दोन महिन्यांपासून आर्थिक चणचण असल्याने हे काम बंद होते. संचेती यांनी रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास या ठिकाणी भेट दिली असता १६,१२,१० एमएम जाडीचे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे स्टील होते. सायंकाळी सहा वाजता ते वैजापूर येथे परतले. सोमवारी सकाळी आठ वाजता पुलाचे बांधकाम करणारे मिस्त्री सोमनाथ शिंदे यांनी रविंद्र संचेती यांना फोनकरून कळविले की, ‘धोंदलगाव येथील पुलाजवळ वस्ती करून राहणाऱ्या एकाचा मला फोन आला असून आपल्या कामावरील स्टील मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चारचाकी वाहनात टाकून चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले’ ही माहिती मिळताच संचेती हे त्या ठिकाणी पोहचले असता उघड्यावर ठेवलेले ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे स्टील चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.