वनाज ते रामवाडी फक्त ३६ मिनिटांत; मेट्रोला पुणेकरांकडून मिळतोय प्रतिसाद

पुणेकरांना आता वनाज ते रामवाडी हे साडे चाैदा किलाेमीटर अंतर ३६ मिनिटांत पार करता येणार आहे. पुणे मेट्राेच्या पहिल्या टप्प्यातील हा मार्ग पूर्णपणे प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते रुबी हाॅल ते रामवाडी या मार्गाचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले.

  पुणे : पुणेकरांना आता वनाज ते रामवाडी हे साडे चाैदा किलाेमीटर अंतर ३६ मिनिटांत पार करता येणार आहे. पुणे मेट्राेच्या पहिल्या टप्प्यातील हा मार्ग पूर्णपणे प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते रुबी हाॅल ते रामवाडी या मार्गाचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. तसेच  पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते निगडी अशा ४.४ किमी उन्नत नवीन मेट्रो मार्गाचे भूमीपूजन पार पडले.
  पुणे शहरात वनाज ते रामवाडी या मेट्राे प्रकल्पाबराेबरच पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पिंपरी ते पुणे जिल्हा न्यायालय , स्वारगेट अशा दाेन मार्गांचा समावेश हाेता. या मार्गांचे काम सुरु झाल्यानंतर या मार्गांच्या विस्तारीकरण, तसेच नवीन मेट्राे मार्गाचे प्रस्ताव दाखल हाेऊ लागले. त्यावर मेट्राे प्रशासन आराखडा तयार करण्याचे काम करीत आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या साडे चाैदा किलाेमीटर मार्गावर बुधवारपासून मेट्राे धाऊ लागली आहे.
  पंतप्रधानांच्या हस्ते तिसऱ्यांदा उदघाटन
  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्रथम दाेन वर्षांपूर्वी पुण्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय मेट्रो मार्गाचे उदघाटन झाले हाेते. त्यानंतर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात  गरवारे महाविद्यालय ते रुबी हाॅल या मार्गाचे उदघाटन झाले. आता तिसऱ्यांदा पंतप्रधान माेदी यांच्या हस्ते या मार्गातील रुबी हाॅल ते रामवाडी या अंतरावरील मेट्राे सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
  आता मेट्राे यशस्वी हाेईल का ?
  वनाझ ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून यामुळे खऱ्या अर्थाने पूर्व पुणे व पश्चिम पुणे मेट्रोच्या सहाय्याने जोडले गेले आहे. या मार्गिकेमुळे विमान नगर, येरवडा, कल्याणी नगर, चंदन नगर, शास्त्रीनगर, खराडी, वडगाव शेरी , तळेगाव, या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे. या मार्गिकेमुळे वनाझ ते रामवाडी असा १४.५ किमीचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत करणे शक्य होणार आहे.
  तसेच प्रवासी भाडे ३० रुपये असणार आहे. त्याचबरोबर या रामवाडी स्थानकाच्या परिसरात असणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना प्रवास करणे सुलभ होणार आहे. हा संपूर्ण मार्ग सुरु झाल्यानंतर प्रवासी संख्या  वाढेल अशी अपेक्षा आहे. प्रवासी संख्या वाढली तर मेट्राे पुण्यात यशस्वी ठरली असे गृहित धरता येईल.
  उन्नत मार्गामुळे हाेणार फायदा
  चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते निगडी (४.४ किमी उन्नत मार्ग) या नवीन मार्गिकेवर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके आहे. या मार्गिकेमुळे भक्ती शक्ती चौक ते स्वारगेट असा थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गिकेमुळे पुणे व पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे पूर्णपणे जोडली जाणार आहेत. या मार्गाच्या जवळ असणाऱ्या निवासी भाग, शैक्षणिक संस्था, औद्योगिक भाग येथील कर्मचारी आणि रहिवासी यांना मेट्रोचा फायदा होणार आहे. चिंचवड रेल्वे स्थानक आणि आकुर्डी बस डेपो यांच्याबरोबर एकिकरण केल्यामुळे येथील प्रवाशांना फायदा होईल.

  रुबी हॉल क्लिनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गिकेमुळे पूर्व पुणे व पश्चिम पुणे मेट्रोच्या नेटवर्कच्या सहाय्याने जोडले गेले आहे. नागरिकांना लांबचा प्रवास करण्याचा फायदा यातून मिळेल आणि चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते निगडी हा पुणे मेट्रोच्या मार्गिकेचा नैसर्गिक विस्तार असून यामुळे त्या भागातील रहिवासी भागाला फायदा होईल.

  - श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्राे

  वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे.

  - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री