man talking on phone

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच ‘वंदे मातरम’ नी शासकीय कार्यालयातील अभिवादन दूरध्वनी संभाषणाच्या सुरुवातीस व्हावे अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

    मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे – वंदे मातरम’ (Vande Mataram) या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ उद्या गांधी जयंतीच्या दिवशी वर्धा येथून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार संस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mumngantiwar) यांनी व्यक्त केला आहे.

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच ‘वंदे मातरम’ नी शासकीय कार्यालयातील अभिवादन दूरध्वनी संभाषणाच्या सुरुवातीस व्हावे अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
    ‘जनगणमन’ हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत हे सर्वमान्य झालेले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर ‘वंदे मातरम’ हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

    ‘वंदे मातरम’ या संबोधनाने प्रत्येक शासकीय कार्यालयात दूरध्वनीवर व प्रत्यक्ष संवाद होत असताना सुरुवात झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल, यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत.
    १. सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून ‘हॅलो’ संबोधन न वापरता, ‘वंदे मातरम’ म्हणावे.
    २. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला ‘हॅलो’ असे न म्हणता ‘वंदे मातरम’ असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना ‘वंदे मातरम’ असे संबोधन करावे.
    ३. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस ‘वंदे मातरम’ हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
    ४. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांनाही सार्वजनिक जीवनात ‘वंदे मातरम’ ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
    ५. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
    ६. विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ती ‘वंदे मातरम’ या शब्दांनी करावी.

    वंदे मातरम् अभियानाचे प्रचार आणि प्रसिद्धी सुद्धा करण्यात येणार आहे.‘वंदे मातरम’ हे संबोधनात्मक व अभिवादनात्मक स्वरुपात, प्रत्येकाने उच्चारावे यासाठी जाणीव जागृही व प्रचार-प्रसार प्रसिद्धीसाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम’ संबोधन अभियानासाठी वृत्त पत्रे, वाहिन्या, समाज माध्यमे इत्यादींमधेन महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने माहिती देण्यात येणार आहे.‘वंदे मातरम’ बाबत प्रचार-प्रसार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास व त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. लघु चित्रपटाच्या माध्यमातून ‘वंदे मातरम’ बाबत जाणीव जागृती करण्यात येईल. ‘वंदे मातरम’ हा फक्त नारा किंवा संबोधन
    नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे, याबाब माहिती प्रसृत करावी व ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या शब्दांनी अभिवादन करण्यात येईल. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता ‘वंदे मातरम’ असे अभिवादन करावे, याबाबत आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. या विषयातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे.