वरुडकडून आष्टीला येणारी वरुड आगाराची बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी

वरुड-आष्टी-तळेगाव या राष्ट्रीय महामार्गावर वरुडकडून आष्टीला येत असलेली वरुड आगाराची बस ही 45 प्रवासी घेऊन जात होती. धाडी घाट चढत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात बसमागे सरकत जागेवरच पलटी झाली. या भीषण अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला.

    साहूर : वरुड-आष्टी-तळेगाव या राष्ट्रीय महामार्गावर वरुडकडून आष्टीला येत असलेली वरुड आगाराची बस ही 45 प्रवासी घेऊन जात होती. धाडी घाट चढत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात बसमागे सरकत जागेवरच पलटी झाली. या भीषण अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. मात्र, दुचाकीस्वाराने उडी घेतल्याने यातून ते दोघेही सुखरूप बचावले. मात्र, त्यांना किरकोळ इजा झाली.

    बसमध्ये असलेल्या 45 प्रवासापैकी 7 प्रवासी गंभीर जखमी झाले. 32 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. यामध्ये महिला चालक किर्ती बोंदरे, वाहक सचिन काळे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी वरुडवरून तळेगाव येथे जाण्यासाठी निघालेली वरुड आगाराची बस (एमएच 40, वाय 5103) ही राजुरा, वाडेगव, हातुर्णा, साहूर, धाडी, येथून प्रवासी घेत आष्टीच्या दिशेने येत होती.

    दरम्यान, धाडी घाटात समोरून येणाऱ्या दुचाकीवर (एमएच 32, एजी 8244) स्वार असलेले श्रीराम सोनवणे (वय 48) व निकिता चौधरी (23, रा. पंचाळा, ता. आष्टी) हे धाडीच्या दिशेने जात असताना दुचाकीला वाचवण्याच्या नादात प्रवासी घेऊन येत असलेल्य बसला भीषण अपघात झाला. या अपघातात बसमागे सरकत गेल्याने बस पलटी झाली. यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला असला तरी दुचाकीवरील दोघेही दैव बलवत्तर असल्याने बचावले.