वरुण सरदेसाई यांना युवासेना सचिव पदावरून हटवले; किरण साळींची नियुक्ती

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची एकनाथ शिंदे यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्याऐवजी शिंदे गटातील किरण साळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांमधील एक म्हणून ओळखले जातात. ते आदित्य ठाकरेंचे मावसभाऊदेखील आहेत.

    मुंबई : शिवसेना विरुद्ध शिंदे गटामधील (Shivsena Vs Shinde Group) तिव्रता अधिक वाढली आहे. युवासेनेचे (Yuva Sena) सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पदावरून हकालपट्टी (Extrusion) केली आहे. त्यांच्याऐवजी शिंदे गटातील किरण साळी (Kiran Sali) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) निकटवर्तीयांमधील एक म्हणून ओळखले जातात. ते आदित्य ठाकरेंचे मावसभाऊदेखील आहे. त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी आरोप केले होते. आक्रमकपणे आंदोलन असो की, महाराष्ट्रभर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी, आदित्य ठाकरेनंतर युवासेनेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात होते. मात्र, त्यांच्या हकालपट्टीने एकप्रकारे आदित्य ठाकरेंनाच शिंदे गटाकडून आव्हान देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

    उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोरांवर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी सुरूच ठेवली आहे. यात किरण साळी, राजेंद्र जंजाळ यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली. युवासेनेच्या अध्यक्ष पदासाठी वरुण सरदेसाई यांचे नाव चर्चेत होते. आदित्य ठाकरेंवर मंत्रिमंडळाची जबाबदारी असताना त्यांना महाराष्ट्रभर युवासेनेचे जाळे तयार करणे किंवा अनेक युवासेनेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य होत नव्हते. यावेळी वरुण देसाईंवर युवासेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार होती. मात्र, त्यांना विरोध देखील होता.