
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील राणे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
वसई : रविंद्र माने – गेल्या ३ वर्षांपासून मनवेलपाडा मुख्य रस्त्यावर ठाण मांडून उभ्या राहणार्या ६०-७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसवर वाहतुक शाखेने दंडात्मक कारवाई केल्यामुळे सदर रस्ता मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मनवेलपाडा ते नालासोपारा हा चार पदरी रस्ता तयार करण्यात आल्यापासून या रस्त्यांच्या दुतर्फा खाजगी कंपन्यांच्या मोठ्या बसेस उभ्या राहू करण्यात येत होत्या. पहाटे या बसेस आल्यानंतर त्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपुर्ण रस्ता अडवून ठेवत असल्यामुळे येथील नागरिकांना दुचाकीवरून प्रवास करणेही कठीण झाले होते.
विरार ते रत्नागीरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर अशा ठिकाणी प्रवास करणार्या या बसेस मनवेल पाड्यात उभ्या राहिल्यांनतर येथील नागरिकांना असुरक्षा भासु लागली होती. भाडे नसलेल्या दिवशी पंधरा-विस बसेस उभ्या राहत असल्यामुळे आणि या बसेसमध्ये चालक वाहक आणि त्यांचे सहकारी जुगार आणि दारुच्या पार्ट्या करीत असल्यामुळे त्यांच्या शेरेबाजीमुळे महिलांना मनवेलपाडा रोडवरुन चालणे मुश्कील झाले होते. अशाच पार्क केलेल्या एका बसमध्ये काही महिन्यांपुर्वी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे मनवेलपाडा रोड भितीदायक आणि गुन्हेगारीकडे वळु लागले होते.
येथील नागरिकांच्या शेकडो तक्रारी आल्यावर अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या बसेसवर कारवाई करण्याची मागणी वाहतुक पोलीसांकडे केली होती. मात्र,या बसेसना दंड ठोठावूनही ते दाद देत नसल्याचे आणि जप्तीची कारवाई केल्यावर जप्त केलेल्या बस ठेवायच्या कुठे? अशी कारणे वाहतुक पोलिसांना देण्यात येत होती. मात्र, त्याचवेळी रस्त्याच्या कडेला काही मिनीटांसाठी दुचाकी उभी करुन खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची, त्यांच्या गाड्या उचलून नेण्याची तत्परता वाहतुक पोलीस दाखवत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. या बेकायदा पार्कींकवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्तीचे हितेश जाधव यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता एवढेच नव्हे तर तीव्र आंदोलनही करण्यात आले होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील राणे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर परिवहन विभाग, चंदनसार, विरार यांना त्या बसेस चालकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही कोणतीच कारवाई झाली नव्हती. १५ ऑगस्ट रोजी पालिकेने आयोजित केलेल्या जनता दरबारात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आमदार हितेंद्र ठाकुर यांनी संबंधीत अधिकार्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर जाग आलेल्या वाहतुक पोलीसांनी ३३ बसेस वर कारवाई करत अवघ्या २ तासात ७३,५०० रुपयांचा दंड वसुल केला. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा बसेस उभ्या राहिल्या तर जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या बसेंसवर १० ते ३६ हजार दंड ठोठावण्यात आले आहे. तसेच यापुढे जप्तीची कारवाई करण्यात येणार असून, जप्त केलेल्या बसेस ठेवण्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आल्याचे वाहतुक पोलीसांनी सांगितले.