ऍल्युमिनीअमचे भंगार विकण्याच्या बहाण्याने फसवणूक, चौकडीकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुतार यांनी मांडवी पोलीस ठाणे गाठले. त्यांचा तक्रारीची मांडवी पोलीसांनी दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

    वसई : ऍल्युमिनीअम मालाचे भंगार विकण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या चौकडीला मांडवी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भावनगर गुजरात येथील जगदिश सरदारमल सुतार हे ऍल्युमिनीअम स्क्रॅपचे व्यापारी आहेत. ते भारतातील अनेक राज्यांमधून मध्यस्थांच्या मार्फत स्क्रॅप विकत घेत असतात. या माहितीतून काही आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून मेढे गाव, वसई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप उपलब्ध असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे सुतार स्क्रॅप घेण्यासाठी वसईत आले असता, त्यांना आरोपींनी सागर मेटल या कंपनीची जीएसटी नंबरची माहीती देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.

    आरोपींनी स्वतःच्या भंगार मालाचे व्यावसायीक आणि एजंट असल्याचेही त्यांनी भासवले. त्यानंतर सुतार यांना २७ लाख, ८७ हजार, २३६ रुपये किंमतीचा १५ टन ऍल्युमिनीअम स्क्रॅप माल मिळवून देण्याचे ठरले. हा भंगार माल मेढे येथील गुरुकृपा रिअलकॉन कंपनी यांच्याकडून विकत घेण्याचे ठरवून आरोपींनी कंपनीच्या मालकाचा ही विश्वास संपादन केला. १५७ रुपये किलो या दराने २७ लाख, ८७ हजार, २३६ रुपयांचा माल ही खरेदी करण्यात आला. ट्रक मागवून त्यात माल ही भरण्यात आला. मात्र, मालाची डिलीवरी करण्याआधी व्यापाऱ्यांकडून जीएसटीसह वरील सर्व रक्कम सागर मेटल या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर करुन घेण्यात आली. पैसे अकाऊंटवर जमा झाल्यावर आरोपींनी आपला खरा रंग दाखवला. आरोपींनी त्यांच्या अकाऊंटवर आलेले पैसे तात्काळ इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करुन स्वतःचे मोबाईल नंबर बंद करुन पोबारा केला.

    त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुतार यांनी मांडवी पोलीस ठाणे गाठले. त्यांचा तक्रारीची मांडवी पोलीसांनी दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांचे खाते गोठविण्यात आले. तांत्रिक तपास केल्यावर आरोपी हे कल्याण-शिळफाटा येथे असल्याची माहीती मिळाल्यावर गुन्हे शाखा कल्याण यांच्या मदतीने ३ आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करुन चौथ्या आरोपीचे नांव निष्पन्न करण्यात आले. चौथा आरोपी हा मुंबई वाराणसी ट्रेनने उत्तर प्रदेश येथे जाण्यास निघाला होता. ट्रेनची वेळ आणि तीने कापलेले अंतर याचे विश्लेषण करुन जीआरपीएफ यांच्या मदतीने त्याच्या चालत्या ट्रेनमधून नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे मुसक्या आवळण्यात आल्या. या चौघांचीही कसून चौकशी केल्यावर त्यांनी कळंबोली, खारघर, तळोजा, धुळे, औरंगाबाद, दिल्ली या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले. गेल्या सहा वर्षांपासून असे गुन्हे करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

    सर्व आरोपी हे उत्तर भारतीय असून अशोककुमार डलाराम प्रजापती, ओमप्रकाश रामविलास शुक्ला, धर्मेंद्रकुमार बबन सिंग आणि सहाबुद्दीन मोईनुद्दीन खान अशी त्यांची नावे आहेत. आरोपी प्रत्येक वेळेस स्वताची नावे, मोबाईल नंबर आणि मोबाईल बदलत असल्यामुळे त्यांचे गुन्हे उघड होत नव्हते. त्यांच्याकडून १५ मोबाईल, २ स्टॅम्प, स्टॅम्प पेंड, ४ मोबाईल बॅटरी, वेगवेगळ्या बँकेचे १० एटीएम कार्ड, ३ चेक बुक, १ मोबाईल चार्जर, ४ सिमकार्ड, घडयाळ, आधारकार्ड, पॅनकार्ड, स्विप्ट कार आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रफुल्ल वाघ, पोलीस निरिक्षक अशोक कांबळे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, हवालदार राजेंद्र फड, तरवारे, संभाजी लोधे, गणेश ढमके, अमोल साळुंखे ढोणे, सोहेल शेख, काश्मिरी सिंग यांनी केली.