
पुर्वेकडील डाॅनलेनमध्ये राहणारे माजी नगरसेवक श्याम पेंढारी आणि त्यांची मुले अमीत पेंढारी, मिथून पेंढारी यांची या परिसरात दहशत आहे.
वसई : नालासोपारा पुर्वेकडील माजी नगरसेवक श्याम पेंढारी आणि त्याच्या मुलांच्या दादागिरीमुळे डाॅनलेन परिसरातील नागरिक धास्तावले असून, या पेंढारी पिता-पुत्रांनी दोन तरुणांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आचोळे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पुर्वेकडील डाॅनलेनमध्ये राहणारे माजी नगरसेवक श्याम पेंढारी आणि त्यांची मुले अमीत पेंढारी, मिथून पेंढारी यांची या परिसरात दहशत आहे. भर रस्त्यात शिवीगाळ करणे, मारहाण करणे, धमकावणे, विरोधात बोलणाऱ्या ऑफीसमध्ये बोलवून दमदाटी करणे असे प्रकार या पेंढारी पिता-पुत्रांकडून केले जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तसे अनेक गुन्हे ही विविध पोलीस ठाण्यात दाखलही आहेत. या पेंढारींनी आपल्या १५-१६ साथीदारांसह रात्री शुभम मिश्रा आणि उदीत सिंग या तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेले मिश्रा आणि सिंग सध्या ग्रीन लाईफ हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार आचोळे पोलीस ठाण्यात श्याम पेंढारी, मिथून पेंढारी, अमीत पेंढारी, आशुतोष मिश्रा, इसरार खान, सुब्रोतो बाऊक, जय रायचुरा, गौत्तम करमाकर, शरया लाड, सर्वेश शर्मा यांच्यासह १५-१६ जणांवर ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वजण फरार झाले आहेत. आचोळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मित्र किरण जोशी यांच्यासह दत्तानी माॅल येथे पार्टीला गेलो होते. तिथे पेंढारी आणि त्याच्या साथिदारांनी दमदाटी आणि धक्का-बुक्की केली. पार्टीला बोलावून किरण जोशी यांना मारण्याचा त्यांचा कट होता, ही बाब कळल्यावर आम्ही तिथून पळून आलो. मात्र, डाॅनलेन मधील आमच्या घरी परतत असताना, तिथे जमलेल्या ३०-३५ जणांनी डाॅनलेनमध्ये अडवून बेदम मारहाण केली. त्यात श्याम पेंढारी, मिथून पेंढारी आणि अमीत पेंढारी यांचा समावेश आहे, त्यांचे कारनामे आम्ही ऐकून आहोत. त्यामुळे जीवाची भिती वाटत आहे. असे हाॅस्पीटलमध्ये उपचार घेणाऱ्या शुभम मिश्रा याने सांगितले. ही घटना घडल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले आहेत.