दिव्यांग व्यक्तींचा जाहिर अपमान केल्यामुळे, ऊन पाऊसात दिव्यांगांनी पाळला आयुक्तांचा निषेध दिन

पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी १८ जुलै २०२३ ला दिव्यांग व्यक्तींचा जाहिर अपमान केला होता.

    वसई : वसई विरार दिव्यांग फेडरेशनच्या वतीने १८ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता महापालिका मुख्यालयाजवळ वसई विरार महानगरपालिका आयुक्तांचा निषेध दिन उन-पावसात पाळण्यात आला. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी १८ जुलै २०२३ ला दिव्यांग व्यक्तींचा जाहिर अपमान केला होता. त्यामुळे दर महिन्याच्या १८ तारखेला मुख्यालयाबाहेर आयुक्तांचा निषेध दिन करण्याचा निर्धार दिव्यांगांनी केला होता.

    त्यानुसार सोमवारी सर्व दिव्यांगांनी मुख्यालयावर धरणे धरले होते. यावेळी महापालिकेतील दिव्यांग विभागाच्या उपायुक्तांना नयना ससाने यांनी भेट देऊन आयुक्तांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. मात्रं, आयुक्तांनी अपमान केल्यामुळे त्यांनीच दिलगिरी व्यक्त करावी असा ठाम निर्धार दिव्यांगांनी केला. शांतता राखून, कोणतीही घोषणाबाजी न करता कार्ड बोर्डच्या माध्यमातून आयुक्तांचा जाहीर निषेध करण्यात आला.

    अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पुढच्या १८ तारखेला आयुक्त निषेध दिनानिमित्त सानेगुरुजी बाल उद्यान येथून महापालिका मुख्य कार्यालयापर्यंत १००० दिव्यांग भव्य रॅलीने करण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे संयोजक बाबु वाल्मिकी यांनी सर्व दिव्यागांना दिली.