
इतका टोकाचा निर्णय घेण्यासाठी कुठला दबाव होता? तसेच त्या वादग्रस्त व्हिडिओ मध्ये असं काय आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
रवींद्र माने-वसई : मुळगावमधील पिता पुत्रांनी एकत्र आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे झाले असून, या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसईतील मोठेभाट, मुळगाव येथे राहणारे कुणाल एडविन डिसोजा (२६) आणि त्याचे वडील एडविन डिसोजा (५९) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी आढळून आले होते. गुरुवारी २१ सप्टेंबरला कुणाल आणि एडवीन दोघेही तणावात होते. दुपारी त्यांनी आई गिता यांच्याशी संपर्क साधून तिघे जण मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले आणि त्यांची नावे ही सांगितली.
तसेच नेरुळ-नवी मुंबई येथील मावशी निता हिला बोलावून आणण्याची विनंती कुणालने केली. त्यामुळे गीता डिसोझा यांनी त्याच दिवशी संध्याकाळी नेरुळ गाठलं. मात्र निता यांचे सासरे काही दिवसांपूर्वी मृत्यु पावल्याने आम्ही सध्या येऊ शकत नसल्याचे तीने सांगितले. त्यामुळे गिता रात्री ८ वा. वसईला निघाल्या, वसईतल्या मुळगाव येथे पोहोचल्यावर गावातील एका परिचिताला झालेला प्रकार सांगितला. त्यांनी गिता यांचे पती एडविन यांना रात्री ११.२० वा. फोनवरून विचारणा केली. त्यावर गीता यांना आज रात्री त्यांच्याकडेच ठेवण्यास सांगितले.
तरीही, काळजीपोटी रात्री १२ वा. गीता डिसोझा आपल्या निवासस्थानी गेल्या. दरवाजे ठोठावून पाहिलं परंतु आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने आणि खिडक्याही आतून बंद असल्याने त्या पुन्हा याच परिचिताकडे परतून रात्री तिथेच झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आपल्या अन्य नातेवाईकांसोबत त्या घरी गेल्या. पुन्हा दारे ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीची तावदाने फोडली तेव्हा अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसून आले. कुणाल आणि एडवीन यांनी गळफास घेतलेला त्यांना दिसून आला. वसई पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर घराचे दरवाजे फोडून पोलीसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यावेळी दोघांच्या खिश्यात वेगवेगळ्या चिठ्ठ्या सापडल्या. त्यात आत्महत्येचे कारण समोर आले. ही पत्रे पोलिसांना तपासासाठी दिशादर्शक ठरली आहेत. वडील एडविन यांच्या पत्रात त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वादामुळे होणारे कलह, जाणीवपूर्वक केलेली अतिक्रमणे, त्याच्या महापालिकेत केलेल्या तक्रारी, त्यावर न केलेली कारवाई तसेच आरोपी जॉर्ज अंड्रांडीस व इतर चार जणांनी या कामासाठी दिलेला त्रास यामुळे जीवन संपवत असल्याचे नमूद आहे.
तर मुलगा कुणालच्या मृत्युपूर्व पत्रात मनसे शहर अध्यक्ष स्वप्निल डिकुन्हा, डाॅ.भारत भूषम वर्मा आणि नदीम खान आत्महत्येचे कारण ठरल्याचे नमुद करण्यात आले आहे. एका व्हिडिओ प्रकरणी एडिट, प्रसारित करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात होता असे या पत्रात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही त्याने मृत्यूपुर्वी केली आहे. कुणाल हा अटक आरोपी स्वप्निल डिकुन्हा याचा खास निकटवर्तीय होता. मात्र त्याच्यासह अन्य दोघां विरोधात गंभीर आरोप करून त्याने आत्महत्या केल्याचे कारण आणि नेमकं घडलयं तरी काय? इतका टोकाचा निर्णय घेण्यासाठी कुठला दबाव होता? तसेच त्या वादग्रस्त व्हिडिओ मध्ये असं काय आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात ३०६, ३४ कलमान्वये स्वप्निल डिकुन्हा, डॉ. भारत भूषण वर्मा, संतोष शर्मा, नदीम खान, जॉर्ज अंड्राडीस, एरॉन अंड्राडीस, नाझरेथ अंड्राडीस, एलटन अंड्राडीस, पीटर अंड्राडीस, ब्रेसवेल अंड्राडीस, अनिल मुर्भेलो यांच्या विरोधात मृत्युस कारणीभुत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वप्निल डिकुन्हा, डॉ. भारत भूषण वर्मा आणि नदीम खान या तिघांना अटक केली आहे. त्यांना २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या दुहेरी आत्महत्येमुळे संपूर्ण वसई हादरली आहे. या दोघांनी आपलं जीवन संपवण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला? याचे अनेक आडाखे बांधले जात आहेत. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे.