७ लाख ७५ हजारांच्या मेफेड्रॉनसह सराईत आरोपीला अटक

अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी नालासोपारा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले.

    वसई-विरार : एका सराईत आरोपींकडून पावणे आठ लाखांचा मॅफेड्राॅन या अंमली पदार्थांसह १० लाख ७५ हजारांचा ऐवज हस्तकर करण्यात गुन्हे शाखा नालासोपाराला यश आले आहे. पश्चिमेकडील हनुमान नगरमध्ये एक इसम हनुमान नगर येथे बुलेटवर बसून अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल तळेकर यांना मिळाली होती. त्यांनी लगेचच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि दहशतवादी विरोधी पथकासह हनुमान नगरात सापळा रचून अत्तेशाम उर्फ इतेशाम उर्फ शाम रफीक अन्सारी या इसमाला ताब्यात गेतले.

    त्यावेळी त्याच्या बुलेटच्या हॅन्डलला अंमली पदार्थांची थैली पोलीसांना सापडली. या थैलीत मॅफेड्राॅन हा सुमारे ७ लाख ७५ हजारांचा अंमली पदार्थ आढळून आला. तसेच अन्सारीकडे १ लाख ४० हजार ५०० रुपयेही सापडले. या प्रकरणी पोलीसांनी अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि बुलेट असा एकूण १० लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

    अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी नालासोपारा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग बागल, गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सचिन कोतमिरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पंडीत मस्के, अमोल तळेकर, उपनिरिक्षक अख्तर शेख, वैभव पवार, हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंखे, अमोल तटकरे, बनसोडे, कल्याण बाचकर, आकाश पवार, प्रेम घोडेराव यांनी ही कारवाई केली.