चोरी केलेल्या वाहनाने झाला चोरट्याचा अपघात, सापळा रचून पोलिसांनी घेतले ताब्यात, १७ गुन्ह्यांची उकल

घटनास्थळी जाऊन पोलीसांनी तपास केला असता, या अपघातात चालकाच्या कपाळाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली.

    वसई : चोरी केलेल्या वाहनाचा अपघात झाल्यामुळे सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या हाती लागला असून, त्याच्याकडून एकूण १७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. मोटर ड्राईव्हींग स्कूलचा व्यवसाय करणारे दिपक शाह यांनी त्यांची व्हॅगनर कार जया पॅलेस हॉटेल, आचोळे नालासोपारा पूर्व येथे रात्री उभी केली होती. सकाळी ती चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शाह यांनी आचोळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली असता, या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    वाहन चोरीच्या अशा घटनांचा मागोवा घेताना गुन्हे शाखा कक्ष २ ने प्रत्येक वाहन चोरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण केले. तसेच शाह यांच्या कारचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यामातून मार्ग काढत असताना सदरची व्हॅगनर श्रीराम नगर, नालासोपारा पूर्वेला अपघातग्रस्त अवस्थेत सापडली. घटनास्थळी जाऊन पोलीसांनी तपास केला असता, या अपघातात चालकाच्या कपाळाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली. सदर चालक हा उपचारासाठी आसपासच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीसांनी त्यादृष्टीने तपास केल्यावर साई हॉस्पिटल, धानीवबाग येथे त्याने उपचार घेतल्याची माहीती मिळाली.

    उपचाराच्या वेळी चालकाने हॉस्पिटलला दिलेल्या पत्त्यावर सापळा रचून पोलीसांनी शादाब उर्फ बाबा उर्फ तावडे नौशाद याला वसई पूर्व या परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर वरील गुन्हा तर त्याने कबुल केलाच, वाहन चोरीचे ११, घरफोडीचा १, मोबाईल चोरीचा १, इतर चोरीचा १ असे १४ आणि मुंबईतील ३ गुन्हे कबूल केले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे स.फौ.संतोष चव्हाण, म.सु. ब.अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली.