
वरील घटना या अत्यंत गंभीर आहेतच पण त्या मागील उद्देश जर खंडणी रूपाने पैसे वसूल करण्याचा असेल तर स्थानिक भूमिपुत्र जमीन मालकांच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आणि धोकादायक आहेत.
रविंद्र माने-वसई : जमीनीच्या वादातून ब्लॅकमेलिंग आणि जाचाला कंटाळून पिता-पुत्राने आत्महत्या केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसईतील पदाधिकाऱ्यांसह एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. वसईतील मुळगाव-मोठे गावात राहणारे एडविन डिसोजा (वय-५५) आणि त्यांचा मुलगा कुणाल (वय-२८) यांनी शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डिसोझा यांच्या जमिनीचे प्रकरण महसुल विभागात सुरु होते. त्यातून त्यांना काही जण ब्लॅकमेलिंग करुन त्रास देत होते. त्यामुळे डिसोझा पिता-पुत्र तणावात होते. या तणावातून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी डिसोजा पिता-पुत्रांनी लिहिलेल्या दोन स्वतंत्र चिठ्ठ्या पोलीसांना सापडल्या आहेत.
एडविन डिसोजा यांच्या पॅन्टच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत ८ जणांची तर कुणालच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत ४ जणांची नावे लिहीण्यात आली होती अशी माहिती मिळाली. या लोकांच्या ब्लॅकमेलिंग आणि जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आढळून आला आहे. त्यानुसार वसई पोलीस ठाण्यात ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मनसेचा शहर संघटक स्वप्निल डिकुन्हा, डॉक्टर वि कुमार वर्मा आणि नईम अशा तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली.
या दुहेरी आत्महत्येमुळे वसई तालुका ढवळून निघाला आहे. वसई तालुक्यातील जमीनींची अनेक प्रकरणे महसुल विभागात पडून आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जमीनी नावावर करण्यासाठी, फेऱफार करण्यासाठी महसुल खात्याच्या पाय-या झिजवाव्या लागत आहेत. त्यातूनच हे प्रकरण घडल्याचा आरोप करुन नागरिक अधिकार समितीचे अध्यक्ष मॅकेन्झी डाबरे यांनी याप्रकरणी महसूल अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी तहसिलदारांकडे केली होती. अशीच मागणी आता मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलींद खानोलकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
जमीनीच्या वादातून कोकरंमवाडी येथे राहणाऱ्या क्लेटन लेस्ली डिकुना, प्रणय रॉबर्ट डिकूना यांना रात्री राहत्या घरी मारहाण झाली होती. जमनीच्या विषयात खंडणी वसूल करणारी एक टोळी वसईत कार्यरत आहे. जमीन व्यवहारातील तांत्रिक त्रुटी शोधून काढायची, मूळ मालकाला गाठायचे, त्याला पैसे मिळवून देतो म्हणून अमिष दाखवायचं, त्याच्याकडून अधिकार पत्र घ्यायचं आणि विकासाला गाठायचं. त्याला घाबरून त्याच्याकडे आर्थिक लाभाची मागणी करायची. पैसे नाही मिळाले तर त्याच्या विरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायचा. नंतर त्याच्याकडून पैसे मिळाले की गुन्ह्याची पोलीस स्टेशन मधून समरी मारून घ्यायची. गुन्हा रद्द करण्यासाठी ती न्यायालयात दाखल करायची अशी कार्यपद्धती या टोळीकडून केली जात आहे.
माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चुळणा गावातील जमीन मिळण्याच्या बाबतीत असाच गुन्हा दाखल होऊन नंतर त्यात समरी मारून ती न्यायालयात दाखल केली गेली आहे. या प्रकरणात मुख्य भूमिका करणा-या इसमाचे व्हिडिओ बनविण्याचे काम आत्महत्या करणारा कुणाल करत होता. त्याच्या आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर तपासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वरील घटना या अत्यंत गंभीर आहेतच पण त्या मागील उद्देश जर खंडणी रूपाने पैसे वसूल करण्याचा असेल तर स्थानिक भूमिपुत्र जमीन मालकांच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आणि धोकादायक आहेत. असे नमुद करून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी मिलिंद खानोलकर यांनी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्याकडे केली आहे.