रस्ता वाहनांनी, फुटपाथवर फेरीवाल्यांनी केला कब्जा, गावगुंडांची हप्ते वसुली जोरात, महापालिकेचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

शहर आणि उपनगरातील सर्व प्रमुख रस्ते, फुटपाथ, उपनगरी रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे.

    रवींद्र माने-वसई : तिसर्‍या मुंबई म्हणून ओळखल्या जाणा-या वसई तालुक्यात अनधीकृत फेरिवाले, बेकायदा पार्कींग आणि गॅरेजवाल्यांनी अतिक्रमण करुन सर्व रस्ते, फुटपाथ काबीज केले असून, हप्तेबाजीतून त्यांच्याकडे प्रशासनाने दुलर्क्ष केले आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन आणि विरार-अलिबाग कॅारिडोरच्या मार्गावर असलेल्या वसई-विरार महानगराला फेरीवाले, अनधिकृत आठवडा बाजार, बेकायदा पार्कींग आणि गॅरेजवाल्यांनी वेढले आहे. शहर आणि उपनगरातील सर्व प्रमुख रस्ते, फुटपाथ, उपनगरी रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. इतकेच नव्हे तर, शहरातील सर्व अंर्तगत रस्ते, फुटपाथावर फेरिवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या फुटपाथानंतर सुरु होणा-या रस्त्यावर डम्पर, टॅंकर, कोंबड्यांच्या गाड्या, टेम्पो, ट्रव्हल्सच्या बसेस, जेसीबी पोकलॅन पार्कच्या बाजूला ठेवल्या जात आहेत.

    या पार्कींगनंतर उरलेल्या रस्त्यावर अनधिकृत गॅरेज आणि पंक्चरवाल्यांनी आपली वर्कशॅाप थाटली आहेत. सहा पदरी रस्त्याचे दोन पदरी वाहनांच्या दुरुस्ती आणि टायरमधील पंक्चर काढण्यासाठी वापरले जात आहेत. विरार, नालासोपारा, वसई या प्रमुख शहरातील एकही रस्ता त्यांच्या तावडीतून सुटलेला नाही. या अनधिकृत व्यावसायिकांकडून प्रशासनाला कोणताही कर दिला जात नाही, तरिही त्यांनी रस्त्यावर केलेली घाण पालिकेमार्फत काढली जात आहे. याउलट मालमत्ता, दिवाबत्ती, शिक्षण, आरोग्य, आयकर, रोडटॅक्स असे कर भरणा-या नागिरकांना मात्र मार्गक्रमण करताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

    अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होऊन अपघात घडत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी रुग्णवाहीका, शववाहीनी, अग्निशमन, पोलीस, पालिका प्रशासनाच्या गाड्या दररोज अडकून पडत आहेत. तरीही महापालिकेचे अधिकारी या फेरीवाल्यांवर कारवाई करीत नसल्यामुळे त्यांना फेरिवाल्यांकडून हप्ते मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. २ हजार ७०० कोटींचे अंदाजपत्रक असलेली वसई विरार महापालिका गेल्या चौदा वर्षात फेरीवाल्यांना हटवण्यात अपयशी ठरली आहे. गेल्या अडीच वर्षात फेरीवाल्यांची संख्या दुपट्टीने वाढली आहे.

    मुख्य रस्त्यांवर खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केली जात असनाही, स्थानिक पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही. तसेच रस्त्यावरील गॅरेजवर वाहतुक पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे या दोन्ही प्रशासनाकडेही अर्थपुर्ण संबंधाबाबत संशयाने पाहिले जात आहे. फुटपाथ बळकावणाऱ्या फेरिवाल्यांना पालिका प्रशासनाबरोबरच स्थानिक नेते, माजी नगरसेवक आणि गावगुंडांची साथ लाभत असल्यामुळे पादचारी, नागरिकांना दादागिरी करण्यापासून, मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. दुकानासमोर ठाण मांडून ते बसत असल्यामुळे धंद्यावर परिणाम झाल्याच्या शेकडो तक्रारी करुन व्यापा-यांनी अनेकदा पालिकेवर केल्या आणि मोर्चाही काढले होते.

    या फेरिवाल्यांवर स्थानिक गुंडाच्या माध्यमातून वचक बसवून काही कथीत पुढारी हप्ते वसुली करुन गब्बर झाले आहेत. दरमहा एकेका प्रभागातून लाखो रुपयांची हप्ते वसुली केली जात असल्यामुळे हप्ते वसुलीतून हाणामा-याही होत आहेत. त्यातून कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असतानाही, पोलीस, वाहतुक, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.