५ वर्षांनी सुटका झालेल्या गोरक्षक वैभव राऊतचे नालासोपाऱ्यात तुफानी स्वागत

१० ऑगस्ट २०१८ ला वैभव राऊतच्या नालासोपारा गाव-भंडार आळीतील घरावर एटीएसने छापा मारून अटक केली होती.

    वसई-रवींद्र माने : हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली गेली ५ वर्ष अटकेत असलेल्या सनातन साधक गोरक्षक वैभव राऊत याचे गुरुवारी रात्री नालासोपारात तुफानी स्वागत झाले. १० ऑगस्ट २०१८ ला वैभव राऊतच्या नालासोपारा गाव-भंडार आळीतील घरावर एटीएसने छापा मारून अटक केली होती. या छाप्यात २० जीवंत गावठी बाॅम्ब, जिलेटीनच्या दोन कांड्या, ४ इलेक्ट्रीक डिटोनेटर्स, २० नाॅन इलेक्ट्रीक डिटोनेटर्स, पाॅयझन लिहीलेल्या १ लिटरच्या दोन बाटल्या आणि वेगवेगळ्या स्फोटकांची पाकीटे सापडल्याची माहिती एटीएस कडून देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी कोल्हापुर, पुणे, सातारा परिसरातून सुधंन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांघरकर, अविनाश पवार यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती.

    या सर्व आरोपींवर हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्यामुळे देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आल्याचा ठपका एटीएसने ठेवला होता. या प्रकरणी सर्व आरोपी गेली पाच वर्ष तुरुंगात होते. कालंतराने त्यातील सह आरोपींना जामीन मंजुर झाला. त्यामुळे वैभव राऊतने ही जानेवारी २०२३ मध्ये उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा खटला लवकर संपण्याची शक्यता नसल्याने आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती. त्यावर न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली खंड पिठाने हा अर्ज मंजुर केला. या जामीनची माहिती मिळाल्यावर गोरक्षक आणि सनातन साधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. २२ सप्टेंबरला वैभवला जामीन मंजुर झाला, तेव्हापासून सर्वजण त्याची वाट पाहत होते. त्याच्या स्वागतासाठी रांगोळ्या, फटाके, फुले, पताके, तोरणे सज्ज ठेवण्यात आली होती.

    मात्र, जामीन अर्जातील तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर काल रात्री त्याची तुरुंगातून सुटका झाली. तो तुरुंगाबाहेर आल्यावर तिथे त्याचे स्वागत फटाक्यांनी करण्यात आले. रात्री साडे अकराच्या सुमारास तो सोपार-भंडार आळीत पोहोचला. त्याच्या स्वागतासाठी भलीमोठी रांगोळी काढून करण्यात आले, त्यानंतर फटाक्यांची आतीषबाजी झाली. बॅन्जोच्या तालावर नाचत-गात वैभवचे स्वागत त्याचे हितचिंतक, गावकरी, मित्रमंडळी आणि गोरक्षकांनी केले. यावेळी तोरणे आणि पताके लावून त्याचे घर सजवण्यात आले होते.