वसई न्यायालयाला लवकरच मिळणार नवी इमारत, वकील संघटनेच्या भेटीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

वसई तालुक्याची गुन्हेपार्श्वभूमी वाढत चालली आहे. वसईचे नागरिकीकरण २५ लाखांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. रोज नवनवीन गुन्हेगारीची प्रकरणे न्यायालयात येत आहेत.

    वसई : वसई न्यायालयाला लवकरच नवी इमारत मिळणार आहे. वकील संघटनेच्या भेटीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिले आहे. वसई तालुक्यासाठी असलेले प्रथम वर्ग फौजदारी न्यायालय तसेच जिल्हा अतिरीक्त सत्र न्यायालयाची इमारत कमी जागेत असल्याने येथे वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांवर निकाल देताना तसेच सुनावणी करताना मर्यादा येऊ लागल्या आहेत. शिवाय वाढती गुन्हेगारी प्रकरणे आणि न्यायालयाला जागेअभावी येणार्‍या अडचणी यावर अखेर वकील संघटनेेने पुढाकार घेत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत वसई न्यायालयासाठी नव्या इमारतीची मागणी केली. चव्हाण यांनी गंभीरपणे दखल घेऊन लवकरच इमारत उभारण्याचे पाऊल उचलले जाईल असे आश्वासन दिले आहे.

    वसई तालुक्याची गुन्हेपार्श्वभूमी वाढत चालली आहे. वसईचे नागरिकीकरण २५ लाखांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. रोज नवनवीन गुन्हेगारीची प्रकरणे न्यायालयात येत आहेत. मात्र जागेअभावी येणार्‍या अनेक अडचणीमुळे वसई न्यायालयात एकूण ५० ते ६० हजार प्रकरणे पेंडिंग आहेत. त्यामुळे न्याय यंत्रणेवरही तणाव येत आहे. छोट्या छोट्या प्रकरणांतही नागरिकांना तारीख पे तारीख अशा प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.

    वाढत्या गुन्ह्यांवर जलदगती निकाल लागावा याकरिता विस्तीर्ण इमारत आणि न्याय यंत्रणेच्या विस्तारासाठी प्रयत्न होणे संयुक्तिक आहे. वसई न्यायालयासाठी याआधी नालासोपारा पूर्वेतील आचोळे-एव्हरशाईन सिटी येथे जागेची पाहणी करण्यात आली होती. मात्र तेथील प्रस्ताव रद्द करून वसईतच न्यायालयाची इमारत बांधण्याचे ठरले आहे. मात्र त्याबाबतची प्रोसेसदेखील लालफितीत अडकली आहे. याबाबत वकील संघटनेने अध्यक्ष एडवोकेट जॉर्ज फर्गोस आणि सचिव प्रवीण गावडे यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत ठोस कार्यवाहीचे आश्वासन वकील संघटनेेला दिले आहे. त्यामुळे वसई न्यायालयाला लवकरच नवी इमारत मिळू शकते, असा विश्वास व्यक्त होत आहे.