पुण्याचे राजकारण रंगले ! वसंत मोरे होणार का ‘वंचित’चे उमेदवार?

वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. या नेत्यांच्या भेटीमुळे वसंत मोरे वंचितच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

    पुणे : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय भेटी गाठी वाढल्या आहेत. पुण्यामध्ये राजकारण रंगले असून आता यामध्ये आणखी चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील तडाखेबाज नेते वसंत मोरे हे पुण्यातील तिसरे उमेदवार असणार आहेत. वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. या नेत्यांच्या भेटीमुळे वसंत मोरे वंचितच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

    वसंत मोरे यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे तर वंचितने देखील महाविकास आघाडीमधून बाहेर पडत ‘एकला चलो’चा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर व वसंत मोरे यांच्या भेटीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले, आजची बैठक सकारात्मक झाली. याबाबत दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय सांगण्यात येईल असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचा पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून वसंत मोरे यांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे. याची घोषणा येत्या 31 मार्च किंवा 1 एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे.

    प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “वसंत मोरे यांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात होणार असून याबाबत ३१ मार्चपर्यंत अधिकृत माहिती दिली जाणार आहे. अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचा शेप दोन-दिवसांमध्ये निश्चित होणार आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झाली असून त्याचाच एक भाग होता.” असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.