काळाराम मंदिरात ‘वासंतिक नवरात्रोत्सव’, उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिकमधील काळाराम मंदिराला विशेष ऐतिहासिक वारसा लाभला आहे. काळाराम मंदिरात ९ एप्रिलपासून वासंतिक नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे.

    नाशिकमधील काळाराम मंदिराला विशेष ऐतिहासिक वारसा लाभला आहे. काळाराम मंदिरात ९ एप्रिलपासून वासंतिक नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवादरम्यान काळाराम मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात संस्थांमार्फत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. काळाराम मंदिरात उत्सवादिवशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांना उद्‌घाटक म्हणून बोलावण्यात आले आहे. तसेच धर्मदाय सहायक आयुक्त टी. एस. अकाली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या नाशिकला विशेष महत्व आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन आरती केली होती.

    काळाराम मंदिरात गुढीपाडव्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजता कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कथक नृत्याने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्यानंतर बुधवारी १० तारखेला अतुल तरटे ‘पुरुषोत्तम श्रीराम राष्ट्रपुरुष या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तर गुरुवारी ११ एप्रिल रोजी डॉ. प्रसाद भंडारी ‘बंधविमोचक राम’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर शुक्रवारी कल्याणीताई नामजोशी ‘उपनिषदातील साधना आणि शनिवारी विद्याधर ताठे ‘संत जनाबाईची अभंगभक्ती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी सुवर्णा देवधर ‘गीतांमधून गीतेतील बोध आणि त्यानंतर १६ तारखेला धनश्री नानिवडेकर समर्थायन या विषयावर कीर्तन सादर करणार आहेत.

    गुरुवारी ॲड. प्रेरणा देशपांडे ‘मुक्ताई एकपात्री प्रयोग’ सादर केला जाणार आहे. त्यानंतर रात्री ८ ते १० दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायक ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे जोशी, हर्षद गोळेसर, मोहन उपासनी, प्रसाद दुसाने, प्रसाद गोखले, हर्षदा उपासनी, मेघा भास्कर, चित्रा देशपांडे, तेजस माने, दत्तप्रसाद शहाणे, अभिनेत्री गात, कीर्ती शुक्ल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधील या उत्सवादरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.