वंचित बहुजन आघाडीचाही ‘इंडिया’त समावेश केला जाणार?; शरद पवारांची काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा 'इंडिया' आघाडीत समावेश होणार असल्याचे संकेत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली असून, उद्धव ठाकरे देखील यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’ आघाडीत समावेश होणार असल्याचे संकेत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली असून, उद्धव ठाकरे देखील यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

    विरोधकांच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भात बैठक घेऊन २५ डिसेंबरनंतर त्याचा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे.

    वंचित आघाडीला इंडिया आघाडीचा भाग करावा यासाठी आपण स्वतः मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पुण्यात दिली आहे. त्यामुळे वंचितचे इंडिया आघाडीमध्ये समावेश हा पक्का असल्याची चर्चा आहे. वंचित आघाडीने २६ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक आयोजित केली आहे.

    नवीन वर्षात वंचित ‘इंडिया’त

    मागील २० दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक ५ डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती. आता नवीन वर्षात वंचित आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश झाल्यानंतर राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.