Vehicles stolen in front of Police Commissionerate;

  पुणे : पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान” देत वाहन चोरट्यांनी चक्क पोलीस आयुक्त कार्यालयासमोरूनच पोलिसांचीच वाहने चोरून नेण्याचा धाडसी पराक्रम केला आहे. त्यामुळे पुण्यातील वाहने ‘राम भरोसे’ असेच म्हणावे लागत आहे. त्यासोबतच या वाहन चोरट्यांना पोलिसांचा धाक वाटतो, असेही दिसत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. मतदान प्रक्रियेच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमधून ३ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. विशेष म्हणजे, अद्याप याप्रकरणात गुन्हा दाखल नसल्याची महिती आहे. तत्पूर्वी एक दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

  पुण्यात सर्वाधिक दुचाकींची चोरी

  सर्वाधिक दुचाकींचे शहर असलेल्या पुण्यात सर्वाधिक दुचाकींची चोरीदेखील होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून चोरीचा हा खेळ सुरू आहे. त्याप्रमाणात पोलिसांना गुन्हे उघडकीस करण्यासदेखील यश येत नसल्याचे वास्तव आहे. मागच्या सव्वातीन वर्षांत शहरातून २४ कोटी ६८ लाखांची ५ हजार ८२२ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, रिक्षा व कारचा देखील समावेश आहे.

  महाराष्ट्रातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानी खाली असलेले पुणे

  सुरक्षित शहरासाठी महाराष्ट्रातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानी खाली असलेले पुणे. शहरभर असलेले हे जाळ मात्र वाहतूक शाखेसाठी पर्वणीच ठरत आहे. वाहतूक नियमांवर बोट ठेवून कोट्यवधींचा दंड मात्र पोलीस दरवर्षाला पुणेकरांना ठोकत आहे. पण, त्याचवेळी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी या सीसीटीव्हींचा म्हणावा तसा उपयोग पोलिसांना अथवा पोलीस त्याचा हवा तसा उपयोग करत नसल्याचे दिसत आहे. त्यातही एखाद्या महत्वाच्या घटनेचा तपास करताना मोक्याच्या ठिकाणचेच कॅमेरे बंद असल्याचे ऐनवेळी पोलिसांना समजते आणि तपासाची गती मंदावते.

  तक्रारदारांना दोन-चार दिवस वाट पाहावी लागणार
  वाहनचोरीबाबतदेखील अशाच अनेक अडचणी आहेत. त्यात दुचाकी चोरीचा तपास स्थानिक पोलिसांकडून किती गांर्भियाने केला जातो, याबाबत न बोललेच बरं. गुन्हा नोंद करण्यासाठीच तक्रारदारांना दोन-चार दिवस वाट पाहावी लागणार. आधी परिसर शोधा, मिळते का बगा, सापडेल अशी कारणे देऊन गुन्हाच दाखल होत नाही. दुचाकी सापडलीच नाही तर गुन्हा नोंद होतो, असे प्रकार यापुर्वी अनेकवेळा घडलेले आहेत.

  गुन्हे शाखेकडून या चोरट्यांवर विशेष लक्ष

  दुसरीकडे गुन्हे शाखेकडून या चोरट्यांवर विशेष लक्ष दिले जाते. पण, त्यांनाही विशेष असे यश मात्र येत नसल्याचे गेल्या काही वर्षांपासून पाहिला मिळत आहे. असे असताना आता चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत पोलीस आयुक्तालयासमोर पार्क केलेली वाहनेच चोरून नेत ती जागा देखील सुरक्षीत नसल्याचे सिद्धकरून दाखविले आहे. निवडणूकीच्या काळात तीन वाहने चोरीस गेली आहेत. त्यातील एक दुचाकी इस्कॉन मंदिर परिसरात चोरट्याने सोडून दिल्याचे समोर आले आहे. त्याने ही दुचाकी तिथे सोडल्यानंतर तेथून एक दुसरी दुचाकी चोरून नेली आहे. तर, इतर दोन दुचाकींचा शोध अद्यापही लागलेला नाही. यासोबतच विशेष म्हणजे, याप्रकरणात गुन्हा मात्र अद्याप दाखल नाही. त्यामुळे पोलिसांचीच वाहने चोरीचे गुन्हे दाखल होत नसतील तर सर्व सामान्यंच काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

  अडीच महिन्यातच ४०० वाहने चोरीस
  या वर्षाच्या सुरूवातीपासूनच चोरट्यांनी वाहन चोरीचा धडाका लावला आहे. अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत जवळपास १ कोटी ५१ लाख ८४ हजार रुपयांच्या घरात आहे. शहरातील वाहन चोरींची तीव्रता यावरून दिसत आहे. दिवसाला शहरातून सरासरी सहा ते सात वाहने चोरीला जात आहेत.

  स्वतंत्र दोन ‘वाहन चोरी विरोधी पथक’ कामाला

  वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र दोन ‘वाहन चोरी विरोधी पथक’ आहेत. त्यांची उत्तर, दक्षिण अशी विभागणी केली आहे. तसेच, त्यांच्या कामांचे वाटप केले आहे. पण, या पथकांना वाहन चोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात म्हणावे तसे यश येत नसल्याचे दरवर्षीच्या आलेखावरून दिसून येत आहे.