दाभोलकर हत्याप्रकरणी आज निकाल, पाच जणांवर आरोप; राज्यभराचं खटल्याकडे लक्ष

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दहा वर्ष पूर्ण होत असताना या हत्याप्रकरणाचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. खटल्यात ५ जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या निकालाकडे पुण्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दहा वर्ष पूर्ण होत असताना या हत्याप्रकरणाचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. खटल्यात ५ जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या निकालाकडे पुण्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
  पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला डॉ. दाभोलकर यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. या हत्येचा सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर एटीएस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास केला.
  या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सुरुवातीला खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर त्यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे  ॲड. प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले.  त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते.
  या कलमांनुसार आरोपी निश्चिती
  तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर  भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.
  कर्नाटक पोलिसांनी उलगडला हत्येचा कट
  बंगळूरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खुनाप्रकारणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळेला ताब्यात घेतले होते.  त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊत याचे धागेदोरे मिळाले. त्याच्या घरातून पोलिसांनी शस्त्रांचा आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे  पोलिसांनी शरद कळसकरला अटक केली. त्याने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली.