Versova is the Navratna mine, Versova Gaurav Award Ceremony is held in Thattamat

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्सोव्यातील वेसावे हा विभाग इथल्या कोळी संस्कृतीने समृद्ध झालेला आहे. यांचे हे वैभव जपण्याची गरज आहे. म्हणून मुंबईमध्ये कितीही मोठ्या इमारती झाल्या, तरीही या कोळीवाड्यांचे डीमार्केशन अबाधित रहायलाच पाहिजे आणि त्याला संरक्षित करण्याचे काम आपले आहे.

  मुंबई : अतिशय तडफदार, जनतेचे काम करणाऱ्या, जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडविण्याऱ्या वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांची ओळख आहे. येथील मतदार त्यांना सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून का निवडून देतात याचे उत्तर या वर्सोवा गौरव पुरस्कारामधून मिळते. वर्सोवा ही तर नवरत्नांची खाणच असून दरवर्षी या पुरस्कार विजेत्यांची वाढ होतच जाते, असे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोव्यात काढले.

  वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यातर्फे वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम येथील सिटी इंटरनॅशनल शाळेजवळील म्हाडा मैदानामध्ये ‘वर्सोवा महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आलेले आहे. दि,१३ ते २२ मे  पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते,

  यावेळी शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार व माजी मंत्री अँड.आशिष शेलार, प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार डॉ. भारती लव्हेकर तसेच माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर व माजी नगरसेविका रंजना पाटील यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन झाले.

  देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, वर्सोवा विभागामध्ये, झोपडपट्टी असो, चाळी असोत, इमारती असोत, बंगले असोत, किंवा कोळीवाडे असोत, लव्हेकर स्वतः लक्ष घालून येथील समस्या व अडचणी सोडवतात, या विभागात जाऊन येथील जनतेची कामे करतात. त्यामुळेच, वर्सोव्याच्या जनतेने त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून दिले. वर्सोव्यातील वेसावे हा विभाग हा इथल्या कोळी संस्कृतीने समृद्ध झालेला आहे. यांचे हे वैभव जपण्याची गरज आहे. म्हणून मुंबईमध्ये कितीही मोठ्या इमारती झाल्या, तरीही या कोळीवाड्यांचे डीमार्केशन अबाधित रहायलाच पाहिजे आणि त्याला संरक्षित करण्याचे काम आपले आहे. त्यासाठी मी, आशिष शेलार व भारती लव्हेकर आम्ही अनेक बैठका घेतल्या व हे डीमार्केशन चे काम करून घेतले आणि हे डीमार्केशन तसेच अबाधित राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

  यावेळी  आमदार अँड.आशिष शेलार म्हणाले की, मुंबईमध्ये मेट्रो सुरू करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. २०० किलोमीटर च्या मेट्रो चे जाळे तयार करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. येणाऱ्या काळात मुंबईचा मेट्रोमॅन म्हणून त्यांना पुरस्कार दिला गेला तर नवल वाटू नये. कारण ते खऱ्या अर्थाने मुंबईचे मेट्रोमॅन आहेत.

  आमदार डॉ.भारती लव्हेकर आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाल्या की,आपण २०१४ पासून सलग दुसऱ्यांदा येथे आमदार म्हणून निवडून आल्यावर वर्सोव्याचा सर्वांगिण विकास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे शक्य झाला आहे.वर्सोवा खाडीतील ५५ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी फडणवीस यांनी ४ कोटी १ लाखांचा  निधी दिला. डीपी मध्ये कोळीवाडे अधोरिखीत करण्याचा निर्णय देखील फडणवीस यांनी घेतला.

  या वर्षीचा २०२२ चा वर्सोवा गौरव पुरस्कार हा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते के. सी. बोकाडिया, प्रसिद्ध बॉलिवूड आणि अभिनेते व दिग्दर्शक श्रेयस तळपदे, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक शशी रंजन, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राकेश कमलाकर सारंग, ज्येष्ठ पत्रकार वैजयंती विनय आपटे, प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती सप्रू, प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव, जागतिक कुस्तीपटू संदीप यादव, प्रसिद्ध व्यावसायिक  अझीझ पिरानी, प्रसिद्ध साउंड अल्केमिस्ट आशिष रेगो, प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन हिफजूररहमान एम. कासम यांना देण्यात आला. हा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख  अतिथी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच यावेळेस प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सलमा आगा, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक, प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल आणि प्रसिद्ध सिनेअभिनेता अली खान सुद्धा उपस्थित होते. यांचा सुद्धा यावेळेस सत्कार करण्यात आला.