मुंबईकरांनो, आरोग्याची काळजी घ्या; गुणवत्ता घसरून हवा होतीये विषारी

शहरातील हवा विषारी (Poisonous Air) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, प्रदूषणामुळे (Pollution) श्वसन आणि दम्याचे रुग्ण ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

    मुंबई : शहरातील हवा विषारी (Poisonous Air) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, प्रदूषणामुळे (Pollution) श्वसन आणि दम्याचे रुग्ण ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

    रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचार आणि औषधांच्या वापरात बदल केला जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विशेषतः जे लोक आधीच फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. प्रदूषणाच्या अच्छादनामध्ये गुरफटलेले हे शहर आता उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये आणखी वाढ करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

    गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील वातावरण सतत बिघडत आहे. मान्सून संपल्यानंतर शहरातील हवेचा दर्जा ‘चांगल्या’वरून ‘मध्यम’ श्रेणीपर्यंत पोहोचला आहे. काही भागात हवेची गुणवत्ता ‘खराब’वरून ‘अत्यंत खराब’ श्रेणीत गेली आहे. संपूर्ण शहराची हवा मध्यम दर्जाची असली, तरी कुलाबा, माझगाव, मालाड, चेंबूर आणि बीकेसी या भागातील हवेची वाईट दर्जाची नोंद करण्यात आली आहे.

    गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून येणाऱ्या रुग्णांची मुख्य समस्या प्रदूषण आहे. ओपीडीतील संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढली आहे. रुग्णाला ताप किंवा संसर्ग नसल्यास, हवेतील धूळ आणि कणांमुळे अॅलर्जी, दमा, सीओपीडी आणि इतर फुप्फुसांशी संबंधित आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.